एसटी कर्मचारी संपाच्या पाठीमागे भाजप; नाना पटोलेंचा आरोप

मुंबई : राज्यात दिवाळीच्या अगोदरपासून  एसटी कर्मचाऱ्यांनी विलगीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. राज्य सरकार आणि थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांनंतर देखील एसटी कर्मचाऱ्यांनी आपला निर्धार कायम ठेवला आहे. त्यातच या सगळ्याच्या पाठिशी भाजपा असून हा पक्ष आता विचलित झाला आहे, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील विरोधकांवर निशाणा साधला आहे.

नावा पटोले यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून भाजपावर टीका केली आहे. त्यामध्ये सध्या सुरू असलेल्या एसटी कर्मचारी संघटनांच्या आंदोलनावर देखील त्यांनी राज्य सरकारच्या वतीने भूमिका मांडली. “एसटी कामगारांच्या बहुतांश मागण्या दिवाळीपूर्वी पूर्ण केल्या. करोना काळातही राज्य सरकारने त्यांचे पगार, टीए-डीए त्यांना दिले. पण राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा भाजपाचा हा प्रयत्न आहे. भाजपा फार डिस्टर्ब झाली आहे. त्यांनीच ही खेळी खेळलेली आहे. एसटी कामगारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी सगळ्यांना यात पाडलं. परिणामी दिवाळीच्या काळात प्रवाशांची गैरसोय झाली. एसटी कामगारांची दिवाळी अंधारात झाली”, असे  नाना पटोले म्हणाले आहेत.

दरम्यान, नाना पटोले यांनी यावेळी भाजपाचे सरकार असताना देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांनी खासगीकरणाचा मुद्दा उपस्थित केला आहे.

“आमचा भाजपाला सवाल आहे की राज्यात फडणवीसांचं सरकार होतं. तेव्हा मुनगंटीवार अर्थमंत्री होते. याविषयी भूमिका मांडणारे त्यांचे व्हिडीओ सगळ्यांनी पाहिले. तेव्हा त्यांना खासगीकरण हवं होतं.

केंद्रात तुमचं सरकार असताना सगळ्याचं खासगीकरण तुम्ही करता आणि महाराष्ट्रात सरकारीकरणाच्या गोष्टी तुम्ही कशा करता? ही दुटप्पी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी समजून घेतली पाहिजे. कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, तुम्हाला न्याय मिळवून देण्याची काँग्रेसची भूमिका राहील”, असे  नाना पटोले म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.