जळगाव : गुरुवारी नागरिकत्त्व दुरुस्ती कायद्यावरून जळगाव महापालिकेत जोरदार खडाजंगी झाली. भाजपच्या वतीने नागरिकत्त्व दुरुस्ती कायद्याचे स्वागत करत केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. त्याचवेळी शिवसेनेचे नगरसेवक इब्राहिम पटेल यांनी निषेध करत यांनी थेट राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला.
महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव महापालिकेची सभा गुरुवारी सकाळी 11 वाजता आयोजित केली होती. सभेला सुरुवात होताच भाजपने अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. ठराव मांडल्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक इब्राहिम पटेल यांनी जोरदार आक्षेप घेतला. त्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली.
‘नागरिकत्त्व सुधारणा कायद्याला पाठींबा देणाऱ्यांचा निषेध असो’, ‘भारतीय संविधानाचा विजय असो’, ‘हिंदू-मुस्लिम भाई भाई’, अशा घोषणा देत सभागृहातून राजदंड पळवून नेण्याचा प्रयत्न केला. तर भाजपच्या नगर सेवकांनी ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’, अशा घोषणा दिल्याने सभागृहात शिवसेना भाजप नागरसेवक आमनेसामने आले.
भाजपच्या काही नागरसेवकांनी धावत जाऊन राजदंड पळवणारे इब्राहिम पटेल यांना सभागृहाच्या वेलमध्ये पकडले. या सभेला उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, आयुक्त डॉ. उदय टेकाळे उपस्थित होते.