पुण्यातून संग्राम देशमुख विधान परिषदेसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर

मुंबई – विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघासाठी आज भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत; पण या यादीतून कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलत संग्राम देशमुख यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मागील निवडणुकीत शिरीश बोराळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते सतीश चव्हाण यांचा पराभव केला होता. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीकडून यंदा पुन्हा एकदा सतीश चव्हाण यांनाच उमेदवारी देण्याची शक्‍यता आहे.

पुण्यातून माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. तसेच महापौर मुरलीधर मोहोळ, रवींद्र भेगडे, अभाविपचे राजेश पांडे यांच्याही नावाची चर्चा सुरू होती.

अखेर पुणे पदवीधरसाठी संग्राम देशमुख यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमधून संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दुसरीकडे अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी नितीन धांडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या पाचही जागा लढवण्याची तयारी केली आहे.

पुढील महिन्यात 1 डिसेंबर रोजी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. त्यानंतर तिसऱ्या दिवशी 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.