नांदेड : भाजपने आज राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी तिसरी यादी जाहीर केली. या यादीसोबतच भाजपने नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. भाजपने नांदेड पोटनिवडणुकीसाठी संतुक हंबर्डे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार वसंत चव्हाण विजयी झाले होते. मात्र, त्यांच्या निधनामुळे नांदेडमध्ये पोटनिवडणूक होत आहे. या ठिकाणी काँग्रेसने वसंत चव्हाण यांचे चिरंजीव रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
कोण आहेत संतुक हंबर्डे ?
हंबर्डे कुटुंबाचा नांदेड ग्रामीणमध्ये बऱ्यापैकी प्रभाव आहे. भाजपचे उमेदवार संतुक हंबर्डे यांचे बंधू मोहन हंबुर्डे हे मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून आमदार झाले होते. संतुक हंबर्डे हे नांदेडमधील भाजपचे नेते आहेत. मागील काही वर्षांमध्ये त्यांनी भाजपमध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या.
नांदेडमध्ये होणार तिरंगी लढत
या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने वसंत चव्हाण यांचे चिरंजीव रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे तर भाजपकडून संतुक हंबर्डे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच एआयएमआयएम पक्षाकडून इम्तियाज जलील हेदेखील ही निवडणूक लढवणार आहेत. यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे.