स्थायीच्या अध्यक्षपदावरून राष्ट्रवादीची भाजपवर टीका
पिंपरी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यामुळे नगरसवेक रवी लांडगे यांना स्थायी समितीच्या अध्यक्षपदापासून दूर ठेवल्याचे कळाले. मात्र भाजपमध्ये नगरसेवक शीतल शिंदे, शत्रुघ्न काटे आदींसह अनेक निष्ठावंतांना स्थायी समिती अध्यक्ष पदापासून दूरच ठेवले आहे. त्यावेळी भाजपला पक्ष निष्ठा दिसली नाही का? असा सवाल महापालिकेचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी केला आहे.
याबाबत पत्रकारांशी बोलताना मिसाळ म्हणाले की, नगरसेवक रवी लांडगे वैयक्तिक कामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले आहेत. त्याबाबत त्यांनी देखील खुलासा केला आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदाला पाठिंबा मागण्यासाठी ते आले नव्हते. रवी लांडगे यांना भाजप मधील नेत्यांनी अध्यक्षपद देण्याचा शब्द दिला होता. शहरात भाजप वाढविण्यासाठी रवी लांडगे यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मोठा वाटा आहे. त्यांना स्थायीचे अध्यक्ष पद न देऊन पक्षाने त्यांच्यावर अन्यायच केला आहे.
सांगली पॅटर्न राबविणार
सध्या भाजपमध्ये अनेक नगरसेवक नाराज आहेत. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. त्यांच्यासोबत आमच्या बैठकाही सुरू आहेत. त्यांना एकत्रित घेऊन आम्ही सांगली पॅटर्न राबवत असल्याची माहिती मिसाळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली