पुणे – लोकसभा मतदार संघातील गिरीश बापट यांच्या विजयात वडगावशेरी विधानसभा मतदार संघाचा मोठा वाटा मानला जात आहे. कारण ज्या मतदार संघातून भाजपला कधीही आघाडी फारशी आघाडी मिळाली नव्हती. त्या मतदार संघातून तब्बल 56 हजार 821 मतांची आघाडी मिळाली आहे. हा मतदार संघ पारंपारिकरित्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या मतदार संघातून राष्ट्रवादीचे आमदार निवडून येत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत येथून भाजपचे जगदीश मुळीक हे निवडून आले. त्यानंतर या मतदार संघातील चित्र बदलेले दिसले. पालिका निवडणुकीत सुद्धा याठिकाणी भाजप आणि सेनेचे वर्चस्व राहिले आहे. या मतदार संघात भाजपचे 14 नगरसेवक आहेत. त्यातील अनेक जण हे राष्ट्रवादीमधून आलेले आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचे दोन आणि रिपाइंचे दोन नगरसेवक आहेत. त्याचा फायदा या निवडणुकीत बापट यांना झाला आहे. कोथरुडपाठोपाठ वडगावशेरीमधून आघाडी मिळण्यात यश आले आहे.
बापट यांना मतदार संघातून तब्बल 1 लाख 17 हजार 664 मते मिळाली आहेत. तर कॉंग्रेसचे मोहन जोशी यांना 80 हजार 843 मते मिळाली आहेत. या मतदार संघात नावाला काही ठिकाणी कॉंग्रेसचे पदाधिकारी आहेत, पण कॉंग्रेसचा नगरसेवक राहिलेला नाही. त्यामुळे कॉंग्रेसला जी काही मदत होणार होती, ती राष्ट्रवादीकडून. पण ती सुद्धा काही प्रमाणातच झाली आहे. राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक आहेत, पण त्यातील काही नगरसेवक हे पक्षाच्या आदेशाप्रमाणे इतर मतदार संघात प्रचारासाठी गुंतलेले होते,त्यामुळे सुद्धा अडचण झाली. वंचित आघाडीला या मतदार संघातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. वंचित आघाडीच्या उमेदवाराला या मतदार संघातून तब्बल 21 हजार 84 मते मिळाली आहेत.
आगामी विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून भाजपमधील अनेक नगरसेवकांनी याठिकाणी या निवडणुकीत चांगले काम केल्याचे दिसते. त्याचबरोबर शिवसेना आणि रिपाइंनेसुद्धा आपल्या भागात चांगली प्रचार यंत्रणा राबविल्याने त्याचा फायदा बापट यांना झालेला दिसतो.