मात्र, मनधरणीचे प्रयत्न होणार असल्याचेही सूतोवाच
नागपूर : राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे स्वपक्षावर नाराज असल्याची बाब दडून राहिलेली नाही. मात्र, खडसे नाराज असल्याचे भाजपने प्रथमच मान्य केले आहे.
राज्यातील सत्तेने हुलकावणी दिल्यानंतर भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. पक्षाच्या काही नेत्यांमधील अस्वस्थता वाढीस लागल्याचे संकेत मिळत आहेत. खडसे यांनी तर वारंवार जाहीरपणे नाराजी उघड केली आहे.
त्यातून ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यापार्श्वभूमीवर, भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी खडसे नाराज असल्याची कबुली दिली. अर्थात, भाजपमध्येच राहण्यासाठी खडसे यांची मनधरणी करण्यात येईल.
त्यांच्या डीएनएमध्ये भाजप आहे. त्यामुळे ते पक्ष सोडून जाणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुनगंटीवार बुधवारी येथे विधानभवनाच्या आवारात पत्रकारांशी बोलत होते. त्यांच्या वक्तव्यामुळे खडसे भाजपवर नाराज असल्याच्या बाबीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील सर्वांत ज्येष्ठ मंत्री अशी खडसे यांची ओळख होती. मात्र, एका जमीन व्यवहारात अनियमितता झाल्याच्या आरोपावरून त्यांना 2016 मध्ये मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
तेव्हापासूनच खडसे नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट नाकारले. त्यांच्याऐवजी त्यांच्या कन्येला उमेदवारी देण्यात आली. मात्र, कन्येच्या पराभवानंतर खडसे आणि भाजपमधील दरी आणखीच वाढल्याचे मानले जात आहे.