आठही मतदारसंघांत भाजपसह शिवसेनाही सज्ज

लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या यशानंतर आता विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांपासून वरिष्ठ नेत्यांपर्यंत उत्साह आहे. पुण्यातही अशीच परिस्थिती आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून गिरीश बापट हे विक्रमी मतांनी विजयी झाले. त्यांना पुणे शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघांतून भरघोस मताधिक्‍य मिळाले आहे. या जोरावरच आता पुण्यातील सर्वच जागा या भाजपने लढविण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

हडपसर आणि खडकवासला मतदारसंघांत भाजपचा उमेदवार हवा, असा आग्रह स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांचा आहे. पण राज्यातील वरिष्ठ नेते हे सतत युती होणार असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे युती झाली, तर पुण्यातील कोणते मतदारसंघ सोडण्यात येणार, याबाबत सध्या तरी “सस्पेन्स’ कायम आहे. भाजप-शिवसेनेचे पदाधिकारी याबाबत स्पष्ट बोलायला नकार देत आहेत. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली असता, ते म्हणतात की “आम्ही आठही मतदार संघात लढणार आहोत. कारण आठही आमदार हे भाजपचे आहेत. त्यामुळे आमचा या मतदार संघांवर हक्क आहे.’ शिवसेनासुद्धा “आम्हाला 2009 प्रमाणे विधानसभा मतदार संघ मिळाले पाहिजेत,’ असा आग्रह धरत आहे.

सध्या चर्चेनुसार हडपसर मतदार संघ हा शिवसेनेला सोडायचा आणि त्याबदल्यात इंदापूर हा मतदार संघ घ्यायचा, यामुळे हर्षवर्धन पाटील यांचा मार्ग मोकळा होईल. तसे झाले त्याचबराबेर आणखी कोणते मतदार संघ सेनेला देण्यात येणार याबाबत चर्चा सुरू झालेली नाही.

युतीची अधिकृत घोषणा होईल तेव्हा होईल, निश्‍चित होत नसताना दुसरीकडे भाजपने आठही मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती घेऊन तयारी सुरू केली आहे. त्यापाठोपाठ शिवसेनेनेही आठही मतदारसंघांचा आढावा घेत प्राथमिक यादी तयार केली आहे. भाजपमधील काही विद्यमान आमदारांनी तयारीही सुरू केली आहे. त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी “आम्हाला पक्षाकडून तयारी सुरू करा, असा संदेश आला आहे. त्यामुळे आम्ही तयारी सुरू केली आहे.’

विद्यमान आमदारांना पुन्हा तिकिटे मिळतील, अशी स्थिती सध्या तरी पुण्यात दिसत नाही. कारण भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये काही आमदारांबाबत नाराजी दिसून आली आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

कसब्याची उमेदवारी कोणाला?
2014 मध्ये आमदार म्हणून निवडून आलेले गिरीश बापट खासदार झाल्याने आता कसबा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार कोण असेल, याबाबत उत्सुकता आहे. पुणे शहरातील आठही मतदार संघात आपले वर्चस्व कायम राखत पक्षातील गटबाजीला बाजूला सारून प्रत्येकाला एकत्रित ठेवणे हे मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे सध्या तरी भाजपमधून निवडून येणे सोपे वाटत, पण तिकीट मिळविणे मात्र फार कठीण झाल्याचे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.