चेन्नई : तामीळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख एम.के.स्टॅलिन यांनी एक देश, एक निवडणूक या प्रस्तावाला असणारा विरोध आणखी तीव्र केला. तसेच, भाजपच्या मित्रपक्षांनी आणि लोकशाहीवादी शक्तींनी संबंधित प्रस्तावाला विरोध करावा, असे आवाहनही केले.
द्रमुकच्या विधी शाखेच्या परिषदेत स्टॅलिन बोलत होते. भाजपला देशात एकपक्षीय राजवट आणायची आहे. त्यामुळे त्या पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आणलेल्या प्रस्तावाला विरोध करण्याची गरज आहे. एक धर्म, एक भाषा, एक संस्कृती असे भाजपचे उद्दिष्ट आहे. त्यामुळेच देशावर एकत्रित निवडणुका लादण्याचे प्रयत्न होत आहेत. केंद्रात एक सरकार आणण्याच्या उद्देशातून राज्यांना उद्धवस्त करण्याची भाजपची इच्छा आहे.
एकत्रित निवडणुकांमुळे एका व्यक्तीलाच अधिकार बहाल होतील. ती बाब भाजपसाठीही चांगली नसेल. संबंधित प्रस्तावामुळे एखाद्या व्यक्तीला हुकूमशहा बनवणे शक्य होईल. पण, ते लोकशाहीसाठी चांगले लक्षण नसेल, असे स्टॅलिन म्हणाले. इतर नेत्यांनी एक देश, एक निवडणूक म्हणजेच एकत्रित निवडणुकांचा प्रस्ताव घटनाबाह्य असल्याची भूमिका मांडली. संबंधित प्रस्तावाचे भाजपकडून जोरदार समर्थन केले जात आहे. मात्र, बहुतांश विरोधी पक्षांनी प्रस्ताव मान्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.