कराड – राहुल गांधी हाय हाय.., राहुल गांधी मुर्दाबाद.. मुर्दाबाद…, राहुल गांधी माफी मांगो.., मैं भी सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकारांचा विजय असो.., भारतीय जनता पक्षाचा विजय असो.. अशी घोषणाबाजी करत भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी कन्याशाळेसमोर असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यासमोर स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा निषेध नोंदवत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केले.
लोकसभेत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्याबद्दल भाजपच्यावतीने त्यांचा निषेध नोंदविण्यासाठी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले होते. त्यांनी राहुल गांधींच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. राहुल गांधी शरम करो, होय, मी पण सावरकर, स्वातंत्र्यवीर का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान यासह इतर घोषणा दिल्या. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारले. राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी अशी मागणी भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांनी यावेळी केली.
या जोडे मारो आंदोलनात ना. शेखर चरेगावकर, नगरसेवक विनायक पावसकर, विद्या पावसकर, अंजली कुंभार, सुहास जगताप, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, घन:श्याम पेंढारकर, मुकुंद चरेगावकर, प्रमोद शिंदे, रुपेश मुळे, किरण मुळे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.