शिराळा – कोकरुड, ता. शिराळा जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक बिनविरोध झाल्याने शिराळा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते पुन्हा चार्ज झाले आहेत. माजी मंत्री शिवाजीराव नाईक व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सत्यजित देशमुख यांच्या गटांमध्ये पुन्हा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जाणारे माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव मागे टाकून सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन कोकरुड जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली होती. नव्या उमेदीने कोपरा सभा घेऊन कार्यकर्त्यांमधील मरगळ दूर करण्याचा प्रयत्न केला. कोकरुड गट हा माजी सभापती कै. शिवाजीराव देशमुख यांचा व सत्यजित देशमुख यांचा पूर्वीपासूनचा बालेकिल्ला आहे.
विधानसभा निवडणुकीत शिवाजीराव नाईक व कार्यकर्त्यांना अतिआत्मविश्वास नडला. त्यामुळे मोठ्या मताधिक्याने पराभव स्वीकारावा लागला. त्यावेळी कै. शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव व जिल्हा परिषद सदस्य सत्यजित देशमुख हे कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये दाखल झाले. त्यांनी जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने पोटनिवडणूक लागली होती. यावेळी सत्यजित देशमुख यांचेच चुलते संपतराव देशमुख हे रिंगणात उतरल्याने ही पोटनिवडणूक सत्यजित देशमुख व शिवाजीराव नाईक यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली.
या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी वगळता कॉंग्रेस, शिवसेना, महाडिक युवाशक्ती यांनी उमेदवार उभे केले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शिवाजीराव नाईक व सत्यजित देशमुख यांनी सावधगिरीने पावले उचलली. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन संपतराव देशमुख बिनविरोध निवडून आल्याने कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.