विठ्ठल मंदिरात घुसणाऱ्या भाजप कार्यकर्ते व पोलिसांमध्ये झटापट

पंढरपूर – प्रार्थना स्थळे चालू करण्याची मागणी करत भाजपने राज्यभर आंदोनल सुरु केले आहे. पंढरपूरचे विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर सुरु करण्यासाठी सुद्धा भाजपकडून जोरदार आंदोलन करण्यात आले आहे. यावेऴी आंदोनलकर्त्यांनी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केल्या तेव्हा आंदोलनकर्ते व पोलिसांमध्ये झटापट झाल्याचे बघायला मिळाले आहे.

पंढरपुरातील भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख व भाजप आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी संत नामदेव पायरीजवळ आंदोलन केले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी विठ्ठल मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखले.

भाजप कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत विठ्ठल मंदिर दर्शनासाठी खुले करावे, अशी जोरदार मागणी केली. याच वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी हातात भाजपचे झेंडे घेऊन थेट नामदेव पायरीपासून विठ्ठल मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, या वेळी पोलिसांनी तत्काळ कार्यकर्त्यांना रोखून धरले. या वेळी भाजप कार्यकर्ते व पोलिसांमध्ये झटापट देखील झाली. या सगळ्या घटनेनंतर भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.