नवी दिल्ली – दिल्लीतील महापालिकांमध्ये भाजपने 2500 कोटी रूपयांचा घोटाळा केला असून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी आज आम आदमी पक्षाच्या आमदारांनी दिल्ली विधानसभेत फलक फडकावून मोठाच गदारोळ केला.
त्यांनी सभापतींच्या आसनापुढे जमून भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केली. आपच्या आमदारांनी केलेल्या या गदारोळामुळे सभापती रामनिवास गोयल यांनी पंधरा मिनीटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकुब केले. त्यानंतरही हा गोंधळ सुरूच राहिला.
कामकाज सुरळीत करण्याचा प्रयत्न सभापतींनी करून सुद्धा आपच्या आमदारांची भाजप विरोधातील घोषणाबाजी सुरूच राहिली. या घोटाळ्यांची सीबीआय मार्फत चौकशी केली जावी अशी शिफारस दिल्ली सरकारने केंद्र सरकारकडे या आधीच केली आहे. महापालिका घोटाळ्यावरून गेले काही दिवस भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यात वादंग सुरू आहे.