भुवनेश्वर – ओडिशातील राज्यसभेच्या चारही जागांवर बिजू जनता दलाच्या उमेदवारांची आज बिनविरोध निवड झाली आहे. देशातील १७ राज्यांमधून राज्यसभेच्या (rajya sabha election) ५५ जागांसाठी येत्या २६ मार्चरोजी निवडणुका होणार असून ओडिशात भाजप व काँग्रेसने रिक्त जागांसाठी उमेदवार न दिल्याने राज्यसभेची निवडणूक बिनविरोध सुटली आहे.
१४७ सदस्य संख्या असलेल्या ओडिशा विधानसभेमध्ये बीजेडीचे ११३ तर त्याखालोखाल भाजपचे २३ व काँग्रेसचे ९ आमदार आहेत. ओडिशामधून राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी उमेदवारांना किमान २९ विधानसभा सदस्यांची प्रथम पसंतीची मतं आवश्यक असल्यानं भाजपने निवडणुकीमध्ये स्वारस्य दाखवलं नव्हतं. तसेच नियमानुसार राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल करताना किमान १० आमदारांचे अनुमोदन आवश्यक असल्यानं काँग्रेसही या शर्यतीतून आपोआपच बाहेर पडली होती. चार अपक्ष उमेदवारांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले होते मात्र त्यांच्याकडेही १० आमदारांचे अनुमोदन नसल्याने त्यांचे उमेदवारी अर्ज आज रद्द करण्यात आले.
दरम्यान, विरोधकांकडील तोकडे संख्याबळ बीजेडी उमेदवारांच्या पथ्यावर पडले असून बीजेडीच्या सुभास सिंग, मुन्ना खान, सुजित कुमार आणि ममता महंता यांची राज्यसभावारी निश्चित झाली आहे. येत्या २ एप्रिलरोजी ओडिशातील बीजेडीचे राज्यसभा खासदार अनुभव मोहंती, नरेंद्र कुमार स्वाइन व सरोजिनी हेम्ब्रम तर कॉंग्रेस खासदार रणजीब बिस्वाल यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ समाप्त होत असून त्यांच्या जागा आता नवनिर्वाचित उमेदवार घेतील.