लाहोर – पाकिस्तानातील सिंध प्रांतात दोन प्रवासी रेल्वेंच्या विचित्र अपघातात किमान 40 जण ठार झाले तर 100 जण जखमी झाले. घोटकी जिल्ह्यातील दहरकी येथे हा अपघात घडला.
पाकिस्तानी रेल्वेच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पहाटे साडेतीनच्या सुमारास कराचीहून सरगोधा येथे जाणारी मिल्लत एक्सप्रेस रुळावरून घसरली. त्यामुळे त्याची धडक रावळपिंडीहून येणाऱ्या सर सय्यद एक्सप्रेसला बसली. हा अपघात रैती रेल्वेस्थानकाजवळ घडला.
मिल्लत एक्सप्रेसने दहकरी रेल्वे स्थानक पहाटे तीन वाजून 28 मिनिटांनी सोडले. तीन वाजून 38 मिनिटांनी ती रुळावरून घसरल्याची माहिती तीन वाजून 43 मिनिटांनी कळाली. तर सय्यद एक्सप्रेसने रैती स्थानक तीन वाजून 38 मिनिटांनी सोडले होते.
रुळावरून घसरलेल्या रेल्वेचे डबे बाजूच्या रुळावर पडले होते. त्याचवेळी सर सय्यद एक्सप्रेस तेथे पोहोचली. त्याच्या चालकाने आपत्कालीन ब्रेक वापरण्याच प्रयत्न केला. मात्र तरीही सुरवातीच्या बोगींना ते डबे धडकले.
या अपघातात मिल्लत एक्सप्रेसवे सहा डबे घसरले. तर पाच डबे उलटले. सर सय्यद एक्सप्रेसचे दोन डबे घसरले. तर तीन उलटले. या अपघात सुरवातीला 31 जण मरण पावल्याचे सांगण्यात येत होते, मात्र त्यानंतर आणखी नऊ जण मरण पावले. जखींमध्ये अत्यवस्थ असणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रात्री उशीरापर्यंत रेल्वे मार्ग सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.