पिंपरी – पिसाळलेल्या एका भटक्या कुत्र्याने सुमारे पचंवीस बालकांचा रविवारी अवघ्या काही तासांत चावा घेतला. ही घटना रविवारी (दि. 24) दुपारी रुपीनगर परिसरात घडली. स्थानिक नगरसेवकांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यास फोन लावला असता त्यांचा मोबाइल बंद होता. त्यामुळे तक्रार करायची तरी कोणाकडे, असा प्रश्न नगरसेवक व स्थानिक नागरिकांना पडला.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपीनगर परिसरात मागील काही दिवसांपासून एक पिसाळलेला कुत्रा फिरत आहे. चार दिवसांपूर्वी हा कुत्रा एका लहान मुलीला चावला. शनिवारीही त्याने लहान मुलावर हल्ला केला होता. मात्र रविवारी या कुत्र्याने रुपीनगर परिसरात धुमाकूळ घातला. या कुत्र्याने जवळपास 25 लहान मुलांचा अवघ्या काही तासांत सलग चावा घेतला. लहान मुले घराच्या अंगणात खेळत असताना त्यांच्यावर झडप घालून कुत्र्याने हा चावा घेतल्याचे रोहित संजय मोरे (वय 12) याच्या पालकांनी सांगितले. रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सात लहान जखमी मुलांना पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी काही मुलांना तब्बल सहा टाके पडल्याचे वीर संजय सोळंखे (वय 3) याच्या पालकांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक प्रवीण भालेकर यांनी पशुवैद्यकिय अधिकारी अरुण दगडे यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांचा मोबाइल बंद होता. त्यानंतर भालेकर यांनी आयुक्तांना ही बाब सांगितली आणि याबाबत उपाययोजना करण्याची मागणी केली.