मुंबई – अमेरिकेच्या अध्यक्षपदावर डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यापासून बिटकॉइनच्या किमती एकतर्फी वाढत आहेत. आता डोनाल्ड ट्रम्प यांची सोशल मीडिया कंपनी एक क्रिप्टो ट्रेडिंग प्लॅटफॉर्म विकत घेणार असल्याचे वृत्त पसरले आहे. या कारणामुळे पुन्हा बिटकॉइनच्या दरात वाढ झाली.
सध्या बिटकॉइनचा दर 97 हजार डॉलर प्रति बिटकॉइन इतना झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची कंपनी बक्कड नावाची कंपनी विकत घेणार असल्याचे सांगण्यात येते. ब्लॅक रॉक बिटकॉइन ईपीएफची ऑप्शन्स सुरू झाल्यानंतर अमेरिकेत बिटकॉइन नियंत्रणासाठी एखादी निश्चित चौकट उभारली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तसे आश्वासन डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रचारावेळी दिले होते. त्यामुळे बिटकॉइनच्या किमती वाढत आहेत. बिटकॉइनचे कट्टर समर्थक अॅलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पूर्ण पाठिंबा देण्याबरोबरच बराच निवडणूक निधी दिलेला आहे. याशिवाय अमेरिकन प्रशासनाची कार्यक्षमता सुधारण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या आयोगावर मस्क यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत बिटकॉइन आगामी काळात अमेरिकेत पर्यायी मालमत्ता म्हणून औपचारिक स्थान मिळविण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यामुळे जगभरातील गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीपैकी काही गुंतवणूक बिटकॉइनमध्ये करीत असल्याचे दिसून येते. बिटकॉइन बाबत विविध देशादरम्यान मतभेद आहेत. अमेरिकेतही या विषयावर मतभेद होते. मात्र ट्रम्प यांनी या मालमत्तेला पूर्ण पाठिंबा दिला आहे. सरलेल्या एक वर्षात बिटकॉइनचे दर दुपटीने वाढले आहेत. सध्या बिटकॉइनमधील एकूण गुंतवणूक मूल्य तीन लाख कोटी डॉलरचे झाले आहे. बिटकॉइनने चांदीला गुंतवणूक साधन म्हणून मागे टाकले आहे.