प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 29 –“मर्द आम्ही मराठे खरे, दुष्मनांना भरे कापरे… ‘या गीताचे समूहगान करीत पुण्यातील 6 शाळांतील 1 हजार विद्यार्थ्यांनी पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना 100 व्या जन्मदिनानिमित्त मानवंदना दिली. शुक्रवार पेठेतील शिर्केवाडा येथे 29 जुलै 1922 रोजी नागपंचमीच्या दिवशी बाबासाहेबांचा जन्म झाला होता. याठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आला.
इतिहासप्रेमी मंडळातर्फे शिवाजी रस्त्याजवळील शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळाच्या जवळ आयोजित कार्यक्रमात पुरंदरे यांच्या 100 व्या जन्मदिनानिमित्त ही मानवंदना देण्यात आली. या निमित्ताने शिवचरित्र प्रसारासाठी अवघे जीवन समर्पित करणाऱ्या शिवशाहीरांच्या जन्मस्थानाला गीतांतून मानवंदना देण्याची संधी शालेय विद्यार्थ्यांना मिळाली. कार्यक्रमाला थोरले बाजीराव पेशवे यांचे वारसदार पुष्कर पेशवे, देवदत्त बलकवडे, राजाभाऊ टिपरे, आनंद सराफ, शिरीष मोहिते, इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे आदी उपस्थित होते. यावेळी जन्मस्थान वास्तूवरील नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
बाबासाहेब पुरंदरे यांचे वडील मोरेश्वरराव यांचे संस्कार, दुर्गसहलीतून लागलेली इतिहासाची गोडी, नाटक-पोवाडे-संतसाहित्य याचे विलोभनीय दर्शन, स्वातंत्र्य संग्रामातील घडामोडी, जीवलग सवंगडी आणि खोड्या अशा अनेक आठवणी या वास्तूत आहेत, असे शेटे म्हणाले. हा बाबासाहेबांचा लहानपणीचा जीवन प्रवास देखील या वेळी उलगडण्यात आला.
न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, पेरुगेट भावे हायस्कूल, ज्ञानप्रबोधिनी, नू. म. वि. मुलांची प्रशाला, नू. म. वि. मुलींची प्रशाला, अहिल्यादेवी प्रशाला आदी शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक सहभागी झाले होते.