पेठ (वार्ताहर) – लहान मोठ्या मुलांचे, व्यक्तींचे वाढदिवस होतात. पण येथील सणस वस्तीत चक्क एका राधा या गायीचा वाढदिवस साजरा केला आहे. हा वाढदिवस शेतकरी कोंडाजी सणस यांनी आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे धुमधडाक्यात साजरा केला.
आपला स्वतःचा किंवा घरातील कुठल्याही सदस्यांचा वाढदिवस साजरा करणे हे आता नवीन नाही. आपल्या पाळीव प्राण्यांचे पालनपोषण करणं आणि त्याला घरातील एका सदस्याइतकचं महत्त्व देणारेही आपल्याला आढळतात. मांजर, कुत्रे या पाळीव प्राण्यांचे वाढदिवस साजरे करणारे आहेत. मात्र, आपल्या घरातील गायीचा वाढदिवस साजरा करणारे विरळच!
पेठ येथील सणसवस्तीत कोंडाजी बबन सणस आणि संगिता कोंडाजी सणस यांनी आपल्या पुंगनूर या अत्यंत दुर्मिळ जातीच्या गायीचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला.
शेतकरी पाळलेल्या जनावरांना आपल्या मुलांबाळाप्रमाणेच वागणूक देत असतात. गायीपासुन आपणास दुध, शेण, गोमूत्र मिळत असते. गोपालक कोंडाजी सणस यांच्याकडे तामिळनाडू, आंध्रप्रदेश यख भागात आढळून येणारी पुंगनूर या जातीची गाय आहे. गाय घरी आल्यानंतर सणस यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये वाढ झाली. अनेक प्रदर्शनामध्ये गायीला पारितोषिके मिळाली आहे. या गायीबद्दल अनेक गोपालक संस्था यांच्याकडुन सणस यांच्याकडे माहिती घेण्यात आली. बारामती येथील प्रदर्शनामध्ये खुद्द पवार कुटुंबातील सदस्यानी आपुलकीने गायीबद्दल चौकशी केली आहे.
गायी अत्यंत देखणी, रुबाबदार, शांत स्वभावाने असुन गोपालक कोंडाजी सणस यांच्या स्कॉर्पिओ गाडी मध्ये स्वतः जाऊन बसते. कारेगावात काल्याचे किर्तनामध्ये बंडातात्या कराडकर यांच्यासमवेत किर्तन संपेपर्यंत गायी अत्यंत शांतपणे माणसामध्ये उभी असते.
या गायीचे नाव राधा असून आज चौथा वाढदिवसाच्या निमित्ताने तिला सजवून मिरवणूक काढून भलामोठा केक कापून उपस्थित लोकांना पेढे वाटण्यात आले.