पुणे – पत्नीने पैसे न दिल्याने चिडून अंगावर रॉकेल ओतून पेटवून देऊन तिचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप आणि सात हजार रूपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधीश आर. व्ही. आदोणे यांनी हा आदेश दिला.
अनिल भगवान म्हस्के (वय 38 रा. विश्रांतवाडी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध लक्ष्मी अनिल म्हस्के ( वय 35) यांनी फिर्याद दिली होती. या खटल्याचे कामकाज दिवंगत अतिरिक्त सरकारी वकील सुरेश गवळी आणि अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी पाहिले.
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपाण्यात आले. 25 मार्च 2013 रोजी ही घटना घडली. आरोपी अनिल म्हस्केने त्याच्या पत्नी लक्ष्मीकडे पैसे मागितले होते. मात्र तिने पैसे दिले नाहीत.
म्हणून त्याने चिडून जावून पत्नीला शिवीगाळ केली. हाताने मारहाण केली. तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. ससून हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना लक्ष्मी यांचा 26 मार्च 2013 रोजी मृत्यू झाला होता.