उस्मानाबाद – उस्मानाबाद जिल्ह्यात स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर प्रमाण कमी झाले असून, याकडे प्रशासनाने लक्ष देऊन जनजागृतीची मोहीम राबविणे गरजेचे झाले आहे. उस्मानाबादमध्ये 1 हजार मुलांमागे 917 मुली असे प्रमाण आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी देवीच्या तुळजापूर तालुक्यात सर्वाधिक कमी 887 असे मुलींचे प्रमाण आहे. त्यामुळे “मुलगी वाचवा’ अभियान राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या 4 वर्षांपासून मुलींचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात 2017-18 यावर्षी मुलींचे प्रमाण 914, 2018-19 वर्षी 965, 2019-20 यावर्षी 928, तर 2020-21 यावर्षी 917 असे आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात सर्वांत कमी 887 असे मुलींचे प्रमाण आहे, तर त्यापाठोपाठ उस्मानाबाद तालुक्यात 897 असे प्रमाण आहे.
सर्वाधिक मुलींचे प्रमाण हे लोहारा तालुक्यात 979 असे आहे. भूम तालुक्यात 934, कळंब 950, उमरगा 946, परंडा 907, वाशी तालुका 925 असे प्रमाण आहे. यावर्षी जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयात 11 हजार 727 मुले, तर 10 हजार 755 मुली जन्माला आल्या आहेत.