कल्याण : एका महिलेची रात्रीच्या सूमारास धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली होती. दोन दिवसात या हत्येचा उलगडा करण्यात विठ्ठलवाडी पोलिसांना यश आलं आहे. एका तरुणाचे या महिलेच्या अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. मात्र या महिलेने या प्रेम सबंधास विरोध केल्याने या तरुणाने या महिलेची गळा चिरून हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे या कटात अल्पवयीन मुलगी देखील सहभागी होती.
दिलजीत यादव असं या आरोपी तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. तर जन्मदात्या आईच्या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या 15 वर्षीय मुलीला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर 4 च्या 36 सेक्शन परिसरात मृत विद्या तलरेजा राहत होत्या. त्यांच्या सोबतच त्यांची 15 वर्षीय मुलगीही राहत होती. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी मृतक विद्या यांच्या घरात शिरून त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने गळ्यावर सपासप वार करत गळा चिरून निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तरी हत्या झाली त्यावेळी कोणताही पुरावा मारेकऱ्यांनी ठेवला नसल्याने पोलीस यंत्रणेसमोर आव्हान उभे टाकले होते.
पोलिसांनी या प्रकरणी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला. चौकशी दरम्यान पोलिसांना मयत महिलेच्या अल्पवयीन मुलीचे एका जीन्स कारखान्यात काम करणाऱ्या दिलजीत यादव याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे कळले. मात्र मयत विद्या यांचा प्रेम सबंधास विरोध होता ही माहिती मिळाली. पोलिसांनी हा धागा पकडत तपास सुरू केला असता त्यांना दिलजीत यादव यानेच हत्या केल्याचे उघड झाले. धक्कादायक बाब म्हणजे विद्या यांच्या अल्पवयीन मुलीचा या कटात सहभाग होता.
मुलीने प्रियकराच्या मदतीने आईचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. मी कामाला जाणार त्याचे सीसीटीव्ही फुटेज असणार. आई घरी एकटीच असल्याने आपल्यामधील काट्याला संपवून टाक अशी प्लॅनिंग केल्यावर आरोपी प्रियकराने ठरल्याप्रमाणे विद्या यांची राहत्या घरात हत्या केली. पोलिसांनी दिलजीत यादव याला अटक केली असून न्यायालयाने त्याला 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडी तर अल्पवयीन मुलीची बालसुधारगृहात रवानगी केली आहे.