जन्म-मृत्यूचे दाखले मिळणे होणार सुलभ

गोंधळ थांबणार : रिक्‍त पदे तातडीने भरण्याच्या हालचाली

पुणे –  अपुरे मनुष्यबळ आणि ऑनलाइन यंत्रणेतील चुकांमुळे जन्म-मृत्यू दाखले मिळवताना पुणेकारांना करावी लागणारी कसरत लवकरच थांबण्याची चिन्हे आहेत. या कामासाठी महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमावलीनुसार आवश्‍यक 15 उपनिबंधकाची पदे या महिने अखेरीस तातडीने भरली जाणार आहेत. ऑनलाइन यंत्रणेमध्ये प्रादेशिक भाषेचा समावेश करावा. तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये दाखला मिळावा, यासाठी केंद्रशासनाला पत्र पाठवणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली.

नागरिकांना ठराविक मुदतीत आणि गतिमानतेने जन्म-मृत्यू दाखले मिळावेत, म्हणून नागरी नोंदणी प्रणाली (सीआरएस) पालिकेने सुरू केली आहे. मात्र, या प्रणालीतील सदोष यंत्रणा आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे दाखले मिळण्यास पुणेकरांना दोन-दोन महिने थांबावे लागत आहे. ही बाब दैनिक “प्रभात’ने “जन्म-मृत्यू दाखल्यांचा खेळखंडोबा’ या वृत्तमालिकेद्वारे समोर आणली. त्याची दखल आरोग्य विभागाने घेतली आहे.

महापालिकेने मार्चपासून “सीआरएस’ प्रणाली सुरू केली आहे. त्यावर 15 क्षेत्रीय कार्यालयांत हे दाखले देण्याची सुविधा दिली आहे. मात्र, त्या-त्या क्षेत्रीय कार्यालयात त्याच हद्दीतील दाखले दिले जातात. यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात एक उपनिबंधक दर्जाचा आरोग्य अधिकारी आवश्‍यक असताना, फक्‍त पाच उपनिबंधक देण्यात आले आहेत. त्यामुळे दाखल्यांच्या नोंदी, दाखले वेळेवर देणे, त्यात दुरूस्ती करणे अशी सर्व कामे रखडली आहेत.

10 अधिकारी तातडीने नेमणार
याबाबत डॉ. हंकारे म्हणाले, “प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी एक आरोग्य निरीक्षक देऊन त्यांना उपनिबंधकांची जबाबदारी दिली जाणार आहे. त्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येणार असून आयुक्त प्रशिक्षणावरून आल्यानंतर तो मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. याशिवाय, “सीआरएस’ प्रणालीमधील त्रुटीही समोर आल्या असून त्या दुरूस्त करण्यासाठी राज्य, केंद्रशासनास कळविले आहे. पुन्हा एकदा पाठपुरावा करून सेवा हमी कायद्यानुसार 24 दिवसांत दाखला मिळेल याची खबरदारी घेतली जाणार आहे. पूर्वीप्रमाणे कोणत्याही क्षेत्रीय कार्यालयात दाखला दिला जावा, यासाठीही पाठपुरावा सुरू आहे.’

Leave A Reply

Your email address will not be published.