भिगवण -भिगवण (ता. इंदापूर) परिसरातील कुंभारगाव, डिकसळ, तक्रारवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात पक्षी निरीक्षण, पर्यटन व्यवसाय चालतो. मात्र, सध्या करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. तसेच सावधगिरीचा भाग म्हणून नाविकांनीही पर्यटन काम बंद ठेवले आहे.
भिगवण परिसरात डिसेंबर ते एप्रिल या काळात परदेशातून मोठ्या संख्येने पक्षी येतात. त्यामुळे पर्यटकही आकर्षित होतात. दररोज सुमारे पाचशे पर्यटक भिगवण व परिसरतील गावांना भेटी देतात. सुटीच्या दिवशी ही संख्या सातशे ते 1 हजारच्या दरम्यान असते.
मात्र, सध्या करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे पर्यटकांची संख्या रोडावली आहे. सुमारे 150 ते 200 नाविक व सहव्यावसायिकाच्या व्यावसायवर यामुळे परिणाम झाला आहे. यामुळे हॉटेल व्यवसायालाही फार मोठा फटका बसला आहे. स्थानिक प्रशासकीय यंत्रणांनी नाविक व पक्षी निरिक्षण मार्गदर्शक यांना व्यवसाय बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्यानुसार सर्व पर्यटन व्यावसायिकांनी कामकाज बंद ठेवण्याचे ठरविले आहे. त्यामुळे नेहमी गजबजलेला उजनी बॅकवॉटर परिसरात शुकशुकाट आहे. राज्य सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व नागरिकांनी जमाव न करता आरोग्याची काळजी घ्यावी.
त्यामुळे सरकारने सुटी दिली आहे. सुटी आहे म्हणून नाळगरिकांनी कोठेही जमाव अथवा फिरण्यास जाऊ नये, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कुंभारगाव ग्रामपंचायतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत करोना रोगाबाबत प्रतिबंधात्मक उपाय योजनांबाबत आम्ही व्यवसाय बंद ठेवला आहे. शहरी भागातील पर्यटक व पक्षी अभ्यासक अधिक सख्येने भेट देत असतात म्हणून त्यांना पर्यटनासाठी न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-उमेश सल्ले,
नाविक व पक्षी निरीक्षक, कुंभारगाव.