वीज वाहिन्यांमुळे जाताहेत पक्ष्यांचे बळी

सदोष पद्धतीने वीज वाहिन्या टाकल्याचा पक्षीमित्रांचा आरोप

वडगाव मावळ – मावळ तालुक्‍यातील ग्रामीण भागात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या वीज वाहिन्या सदोष पध्दतीने टाकल्याने पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणावर बळी जात आहेत. वीज विभागात वारंवार तक्रार करूनही या घटनेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप पक्षीमित्र करत आहेत.

या सदोष वीज वाहिन्यांमुळे कावळे, वटवाघूळ आदींचे बळी अधिक जात आहेत. मावळ तालुक्‍यात वीज वाहिन्या टाकताना कमीतकमी खांब उभारून अधिक अंतरावर वीज पुरवठा करण्याची सदोष कामे केली आहेत. या कामामुळे मावळात होणाऱ्या अधिक पावसाने तसेच सोसाट्याच्या वाऱ्याने या वीज वाहिन्या सैल पडतात. त्यातच पावसाळ्यात विजेचा लपंडाव नित्याचा सुरूच असतो. काही खांब झुकल्याने वीज वाहिन्या सैल झाल्या आहेत, तर काही वाहिन्यांवर झाडांच्या फांद्या पडत असल्याने वीज विभाग चार वीज वाहिन्या एकत्रित बांधत असते. या वीज वाहिन्यांवर कावळे व वटवाघूळ बसतात. त्यांचे शरीर दोन्ही वीज वाहिन्यांना स्पर्श करते, यामुळे त्यांचा जागीच मृत्यू होतो. कावळा मेल्याने अनेक कावळे जमा होवून त्या वीज वाहिन्यांवर बसत असल्याने एकाच दिवशी अनेक पक्ष्यांचा बळी जात आहे. पक्ष्यांच्या मृत्यूने पक्षीमित्रांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सदोष पद्धतीने टाकलेल्या वीज वाहिन्या योग्य पद्धतीने टाकण्याची मागणी पक्षी मित्र सोमा भेगडे, अतुल वायकर, रमेश भुरूक, राहुल खळदे, कैलास गायकवाड यांनी केली.

पक्षीमित्र रमेश भुरूक म्हणाले, मावळ तालुक्‍यात वीज विभागाकडून वीज पुरवठा करताना सदोष कामे केल्याने पक्षी व प्राण्यांचे बळी जात आहेत. वीज वाहिन्याला चिकटून मृत्यू झालेल्या पक्ष्यांचा पावसामुळे उग्र वास येत असून मानवी आरोग्यासही धोका निर्माण होतो. मोठ्या प्रमाणावर कावळे व वटवाघूळ यांचा जीव जात असल्याने भविष्यात हे पक्षी चित्रावर दाखवण्याची वेळ येईल. वीज विभागाने त्वरित धोकादायक सैल वाहिन्या व खांब दुरुस्ती करावी.

उप कार्यकारी अभियंता विजय जाधव यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी पक्षी व प्राण्यांचा बळी जात असेल अशी धोकादायक सैल वाहिन्या व खांब त्वरित दुरुस्त करण्यात येतील.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.