पुण्यातही “बर्ड फ्लू’चा शिरकाव?

मृत कावळे तपासणी न करताच कचऱ्यात : पशुसंवर्धन विभागाचे दुर्लक्ष; नागरिकांचा आरोप

 

पुणे – राज्यात “बर्ड फ्लू’ने शिरकाव केलेला असतानाच आता पुण्यातही “बर्ड फ्लू’चा शिरकाव झाल्याची शक्‍यता आहे. बुधवारी कॅम्प परिसरात दोन कावळे मृतावस्थेत सापडले. त्यामुळे खळबळ उडाली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर काही नागरिकांनी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांसह कॅन्टोन्मेंट बोर्डासही संपर्क साधला. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही.

या उलट तुम्ही महापालिकेस ही बाब कळवा, असे सांगत टाळाटाळ केली. त्यामुळे हे कावळे बराचवेळ तसेच पडून होते. त्यानंतर गुरुवारी सकाळी कचरा वेचक कर्मचाऱ्यांनी हे कावळे कोणत्या सुरक्षा साधनांविना उचलून नेले. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर “बर्ड फ्लू’बाबत शासकीय विभाग किती गंभीर आहेत, याची प्रचिती आली आहे.

कॅम्प परिसरातील बाबाजान दर्गा येथील रवींद्रनाथ टागोर शाळेच्या आवारात बुधवारी सकाळच्या सुमारास शाळेच्या गेटजवळ दोन कावळे मृतावस्थेत पडलेले आढळून आले. त्यामुळे हा “बर्ड फ्लू’चा प्रकार असू शकतो. म्हणून या भागातील सामाजिक कार्यकर्ते विकास भांबूरे यांनी तत्काळ पशुसंवर्धन विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर ही माहिती कळविली.

मात्र, त्यांना त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. तसेच, “आम्ही काही करू शकत नाही तुम्ही महापालिकेशी संपर्क साधा’ असे सांगत टोलवा टोलवी केली. त्यामुळे एका बाजूला राज्यात “बर्ड फ्लू’चा हाय अलर्ट जाहीर करत नागरिकांनी असे प्रकार घडल्यास तातडीने कळविण्याचे आवाहन करणारा पशुसंवर्धन विभाग पुण्यात मात्र ही जबाबदारी महापालिकेवर टोलवत असल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

दरम्यान, हे कावळे बुधवारी दिवसभर याच ठिकाणी पडून होते. त्यानंतर, गुरुवारी सकाळी कचरा वेचक कर्मचाऱ्यांनी हे कावळे उचलून नेत कचऱ्यात टाकले. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्‍त केली जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.