अलर्ट! महाराष्ट्रात ‘बर्ड फ्ल्यू’ दाखल; सतर्कता बाळगण्याची सूचना

नवी दिल्ली – देशातील 10 राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव झाला असल्याचे आतापर्यंत निष्पन्न झाले असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. या पार्श्‍वभुमीवर जलाशय, पक्ष्यांचे बाजार, प्राणी-पक्षी संग्रहालय आणि कुकुटपालन उद्योगावरील देखरेख अधिक व्यापक प्रमाणात करण्यात येत आहे. 11 जानेवारी, 2021 पर्यंत देशातील 10 राज्यात “एव्हीयन इन्फ्लूएंझा’सापडल्याचे सिद्ध झाले आहे, असे पशुसंवर्धन व डेअरी विभागाने एका निवेदनात म्हटले आहे.

10 जानेवारीपर्यंत केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेश अशा सात राज्यांत हा प्रादुर्भाव निश्‍चित झाला होता. तर सोमवारी दिल्ली, उत्तराखंड आणि महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या रोगाचा संसर्ग पसरू नये यासाठी नागरिकांमध्ये सतर्कता वाढवावी आणि गैरसमज पसरू न देण्याची सूचना राज्यांना करण्यात आली आहे.

पक्ष्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्‍यक उपकरणे आणि पीपीई किटचा आवश्‍यक तेवढा साठा राखण्याच्या सूचना देखील राज्य सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना करण्यात आली आहे. राज्यांच्या पशुसंवर्धन विभागांनी आरोग्य विभागाशी समन्वय राखून या रोगाची अद्ययावत माहिती देत रहावे. तसेच पक्ष्यांमध्ये पसरत असलेल्या या रोगाचा प्रादुर्भाव मानवामध्ये होऊ देऊ नये, अशीही सूचना राज्यांना करण्यात आली आहे.

दरम्यान, राजस्थानमधील टोंक, करौली, भिलवारा आदी जिल्ह्यांमध्ये तसेच गुजरातमधील वलसाड, वडोदरा आणि सुरत जिल्ह्यामध्येही कावळे आणि प्रवासी पक्षी मरण पावले असल्याचे भारतीय कृषी संशोधन परिषद आणि राष्ट्रीय प्राणी रोग उच्च सुरक्षा संस्थेने म्हटले आहे.

महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातल्या कुकुटपालन उद्योगांमध्ये आणि मुंबई, ठाणे, दापोली, बीड जिल्ह्यांमधील कावळ्यांमध्ये “एव्हियन एंफ्लूएंझा’ पसरला असल्याचे निष्पन्न झाले आहे. हरियाणामध्ये मृत पक्ष्यांची विल्हेवाट लावण्याचे काम सुरू असून तेथील संसर्ग नियंत्रणात्‌ आहे. केंद्रीय पथकाने हिमाचल प्रदेशात भेट दिली असून हे पथक पंचकुला येथे भेट देऊन प्रत्यक्ष पहाणी करणार आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.