बर्ड फ्लू, करोनाचा पोल्ट्रीचालकांना फटका; अफवांमुळे चिकन खरेदीकडे ग्राहकांची पाठ

हनुमंत चिकणे

उरुळी कांचन  – करोनाच्या भितीने व कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतीने पोल्ट्री व्यवसाय सध्या धोक्‍यात आला आहे. सोशल मेडियावरील अफवांमुळे चिकन खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे राज्य सरकारने यावर तोडगा काढून मदत करावी, अशी मागणी पोल्ट्री चालकांनी केली.

पुणे जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांची नुकतीच उरुळी कांचन येथे बैठक पार पडली होती. यावेळी वरील मागणी करण्यात आली. यावेळी भगवान मोठे अक्षय सनस, संजय झांबरे, प्रदीप सोडनवर, राहुल राक्षे, विनोद भोंडवे, अनिल भोंडवे, शंकर जवळकर, विजय जवळकर, नवनाथ सावंत, अजिंक्‍य चौधरी, राहुल जवळकर आदी उपस्थित होते.अंडी उत्पादकांना सरकारने मदत करावी, शेजारील इतर राज्यांप्रमाणे मका, सोयाबीन, डीआरबी आणि इतर पोल्ट्री फिडसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाला सबसिडी उपलब्ध मिळावी.

सोशल मीडियावर जर कोणी शेतकऱ्यांविषयी अफवा पसरवली तर त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. अंड्याचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्यात यावा. वीज बिलात सवलत मिळावी या सर्व मागण्या घेऊन संघटना लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार असल्याचेही भोंडवे यांनी यावेळी सांगितले.

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कुक्‍कुटपालन हा व्यवसाय अनेक तरूण करीत आहेत. परंतु मागील चार ते पाच महिन्यांपासून करोनाच्या अफवेमुळे चिकन व अंड्यांचा खप मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. बरोबर सरकारी खरेदी केलेली मका पोल्ट्री व्यावसायिकांना उपलब्ध करून द्यावी.

नाबार्ड मार्फत दिले जाणारे सबसिडी इतर शेती योजनांसारखे थेट शेतकऱ्यांना द्यावी तसेच ग्रामपंचायत मार्फत पोल्ट्रीला आकारला जाणारा कर कायमस्वरूपी माफ करावा अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.

अफवांकडे दुर्लक्ष करा
करोना विषाणू सांसर्गिक आजार आहे. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संक्रमित होतो. त्यामुळे सोशल मेडियावर येणाऱ्या अफवांकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन पोल्ट्री व्यावसायिक यांच्याकडून करण्यात येत आहे.

करोना, बर्ड फ्लू रोगामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. राज्य सरकारने आमच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात, नाहीतर लवकरच पोल्ट्री व्यवसाय उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही.
– लक्ष्मण भोंडवे,
समन्वयक पुणे जिल्हा अंडी उत्पादक शेतकरी संघटना.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.