पुणे – “बर्ड फ्ल्यू’मुळे खवय्यांनी चिकन, अंड्याकडे पाठ फिरवली आहे. संसर्गाआधी आठवड्यात विशेषत: रविवारी चिकन आणि अंड्याच्या मागणीत मोठी वाढ व्हायची. मात्र, या आठवड्यात ती दिसून आली नाही. सामिष खवय्यांनी आपला मोर्चा मटण, मासळी खरेदीकडे वळविला आहे. आवकच्या तुलनेत मागणी वाढल्यामुळे दोन्हींच्या भावात काही प्रमाणात वाढ झाली आहे.
मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी महिलांकडून व्रत केले जात असल्याने मटण, मासळीच्या मागणीत घट झाली होती. मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर पहिल्याच रविवारी (17 जानेवारी) मटण, मासळीच्या मागणीत वाढ झाली. “बर्ड फ्लू’मुळे चिकन आणि अंड्यांच्या मागणीत घट झाली आहे. मागणीत जवळपास 25 ते 30 टक्के घट झाली आहे, अशी माहिती पुणे जिल्हा बॉयलर असोसिएशनचे संचालक रुपेश परदेशी यांनी दिली.
गेल्या रविवारच्या तुलनेत मासळीच्या मागणीत वाढ झाली आहे. मासळीच्या भावातही 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळी 10 ते 15 टन, खाडीतील मासळी 400 ते 500 किलो, नदीतील मासळी एक ते दोन टन, आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळीची 15 ते 20 टन अशी आवक झाल्याचे मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले. मटणाच्या मागणीत रविवारी मोठी वाढ झाली. किलोमागे वीस रुपयांनी वाढ झाल्याची माहिती पुणे शहर जिल्हा मटण विक्रेता संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी दिली.
प्रतिकिलोचे भाव
चिकन – 170 ते 180 रुपये
मटण- 660 रुपये
पापलेट- 700 ते 1400 रुपये
सुरमई- 480 ते 550 रुपये
हलवा- 480 ते 550 रुपये
रावस- 600 ते 800 रुपये
कोळंबी- 360 ते 550