राष्ट्रीय पुरस्कार विजेती चित्रपट निर्माता भावना तलवार ही दिवंगत चित्रपट निर्माता व ज्येष्ठ अभिनेता गुरू दत्त यांच्या बायोपिकचे दिग्दर्शन करणार आहे. या बायोपिकचे “प्यासा’ असे शीर्षक आहे. तलवार ही आपल्या या आगामी चित्रपटासाठी सध्या कलाकारांची निवड करण्यात व्यस्त आहे.
ज्येष्ठ अभिनेता दत्त यांचे जीवन हे खूपच गहन आणि जटील राहिलेले आहे. यामुळेच ही गोष्टी लिहिण्यासाठी तलवारला तब्बल सात वर्षे लागली आहेत. तथापि, ही बायोपिक वेब मालिकेच्या स्वरूपात सांगण्याऐवजी ती मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तलवार म्हणाली, त्यांचे व्यक्तिमत्त्व “लार्जर दॅन लाइफ’ असे होते. पण त्यांनी 10 वर्षांतच एक निर्माता आणि अभिनेता म्हणून नाव कमविले. तसेच चित्रपट व्यवसायात यश मिळविले. एक अभिनेता म्हणून चाहत्यांची प्रशंसा मिळविली. यासोबत त्यांना अनेक दुःखाचाही सामना करावा लागला. हे सर्व एका चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडणेच योग्य राहील, असा विश्वास तिने व्यक्त केला.
गुरू दत्त यांचे व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवन अनुभवने खूपच रोमांचक आहे. गीता दत्तसोबत त्यांची “बाजी’ चित्रपटात भेट होती आणि हे दोन नवोदित कलाकार यश मिळवित एकमेकांच्या लग्नबंधनातही अडकतात. हा प्रवास खूपच मनोरंजक असल्याचे भावनाने सांगितले.