महिनाअखेरपर्यंत अधिकारी, कर्मचाऱ्यांना फेस रिडिंग रजिस्ट्रेशन पूर्ण करण्याच्या सूचना
पिंपरी – महापालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना थंब इम्प्रेशनऐवजी फेस रिडिंग मशीनद्वारे फेब्रुवारी महिन्यापासून बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक व सक्तीची करण्यात येणार आहे. त्यामुळे 30 जानेवारीपर्यंत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फेस रिडिंग रजिस्ट्रेशन तात्काळ पूर्ण करावे, असे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.
कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर शासन आदेशानुसार थंब इम्प्रेशनमधून अधिकारी व कर्मचारी यांना सवलत देण्यात आलेली होती. तथापि, आता कोविड-19 चे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या आस्थापनेवरील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना फेब्रुवारी-2021 पासून थंब इम्प्रेशन ऐवजी फेस रिडिंग मशीनद्वारे बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक व सक्तीची करण्यात येणार आहे. त्याला अनुसरून सर्व अधिकारी व कर्मचारी यांना फेस रिडिंग रजिस्ट्रेशन 30 जानेवारीच्या आत पूर्ण करून घ्यावे, असे आदेश आयुक्तांनी बजावले आहेत.
विभागांमधील फेस रिडिंग रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर विभागप्रमुखांच्या स्वाक्षरीने त्याबाबतचा दाखला प्रशासन विभागाकडे 30 जानेवारीपर्यंत सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मुदतीनंतर एखाद्या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्याची नोंदणी बाकी असल्याचे आढळल्यास संबंधित विभागप्रमुखांना जबाबदार धरून त्यांच्याविरूद्ध कारवाई केली जाणार आहे.
माहिती व तंत्रज्ञान विभागाने याचे पूर्ण नियोजन करावे. तसेच हे काम कोणत्याही त्रुटी न ठेवता पूर्ण करण्यात यावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.