बायोमेट्रिक हजेरी तपासणीचा पथकाला पडलाय विसर

आतापर्यंत 5 महाविद्यालयांच्या तपासणीचा अहवाल सादर

पुणे – कनिष्ठ महाविद्यालयांतील विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांच्या बायोमेट्रिक हजेरीची तपासणी करण्यासाठी विशेष तपासणी पथकाला विसर पडला आहे. आतापर्यंत 39 पैकी केवळ 5 महाविद्यालयांच्या तपासणीचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे. दरम्यान, आता शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून तपासणी पथकातील अधिकाऱ्यांना स्मरणपत्र पाठविण्यात येणार आहे.

शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिकद्वारेच घेण्याबाबतचा निर्णय 15 जून 2018 रोजी घेण्यात आला होता. बहुसंख्य महाविद्यालयांतील विज्ञान शाखेतील विद्यार्थी महाविद्यालयातील लेक्‍चरला उपस्थित राहण्याऐवजी खासगी क्‍लासमध्ये हजेरी लावत असतात. याबाबतच्या तक्रारी अनेक संघटनांकडून करण्यात आल्या होत्या.

आयुक्‍त कार्यालयाने घेतला कामाचा आढावा
शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून नुकताच तपासणी पथकाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. त्यात पथकाकडून अद्यापही पूर्ण अहवालच सादर झाले नसल्याची बाब समोर आली आहे. याबाबत आश्‍चर्यच व्यक्त करण्यात आले आहे. तात्काळ संबंधित पथकांना अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यासाठी हालचाली सुरू केलेल्या आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनाही तपासणी पथकांच्या अहवालानुसार दोषी महाविद्यालयांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती शिक्षण आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.

पथकाकडून अंमलबजावणीच नाही
प्रत्येक पथकाला 13 महाविद्यालयांची यादी तपासणीसाठी देण्यात होती. तपासणी झाल्यानंतर त्याच दिवशी सांयकाळी अहवाल सादर करण्याचे आदेशही शिक्षण आयुक्तांकडून तपासणी पथकाला बजाविण्यात आले होते. मात्र, याची अंमलबजावणीच पथकाकडून करण्यात आलेली नाही. पथकातील अधिकाऱ्यांना आपआपल्या मुख्य विभागाच्या कामाचा अतिरिक्त ताण आहे. त्या कामकाजातून त्यांना महाविद्यालयांची तपासणी करण्यासाठी वेळच मिळत नसल्याची बाब उघड झाली आहे. तपासणीला जाण्यासाठी वाहनासह इतर कोणतीही आवश्‍यक सुविधाही शिक्षण विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे तपासणी पूर्ण करायची कशी असा प्रश्‍न पथकापुढे निर्माण झालेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.