वाई पालिकेच्या कचऱ्यावर होणार बायोमायनिंग प्रक्रिया

दुर्गंधीच्या जागी दरवळणार फुलांचा सुगंध : वाई शहराची स्वच्छ शहराकडे वाटचाल

वाई  – नेहमीच समस्येच्या गर्तेत असणारा वाई पालिकेचा कचरा डेपो हा पालिका प्रशासनाने धाडसी पाऊल टाकून ठेकेदाराच्या मनमानी कारभाराला आळा घालत वाईकरांच्या जिव्हाळ्याचा परंतु प्रलंबित असणारा प्रश्न सोडविण्यासाठी पालिकेने कंबर कसल्याने वाईकरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. वाई पालिकेचा औद्योगिक वसाहतीतील सोनापूर येथील कचरा डेपोमध्ये अनेक समस्येने ग्रासलेला होता. पालिकेने ठेकेदार नेमून शहरातून कचरा ओला-सुका कचरा गोळा करणे, त्याचे वर्गीकरण करणे, कचऱ्यापासून कंपोस्ट खत, गांडूळ खत तयार करणे असे प्रकल्प चालू करून देखील अपेक्षित उद्दिष्ठ साध्य न झाल्याने ते नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकून राहीले होते. अनेक वेळा कचरा डेपोला आग लागत होती.

कचरा डेपोमुळे परिसरात दुर्गंधी तसेच धुर पसरल्यामुळे परिसरातील लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून पालिका प्रशासनाने नाशिक येथील ईबी एनव्हायरो या एजन्सीला ठेका देवून मार्च महिन्यापासून बायोमायनिंग प्रकल्पाचे काम सूरू केले आहे. या अंतर्गत जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचे संपुर्ण विलनिकरण करून अविघटनशील कचरा वेगळा केला जाणार आहे. यामधील माती, प्लास्टीक, धातुजन्य, व जैविक पदार्थ वेगळे करून पुर्नवापरासाठी पाठविले जाणार आहेत. तसेच यापासून कंपोस्ट खत निर्मिती केली जाणार असून यापासून कचरा डेपोमध्ये फुल झाडे व फळ झाडे लावली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

पालिकेने ओला-सूका कचरा उचलण्यासाठी व्यवस्था केली असून शहरातील नागरिकांना ओला व सूक्‍या कचऱ्याचे वर्गीकरण करून देणे. प्लास्टिकचा वापर करू नये. बायोमायनिंग प्रकल्पामुळे कचरा डेपोमधील समस्या दूर होणार असून निर्माण होणारे कंपोस्ट खत शेतकऱ्यासाठी उपलब्ध करून दिले जाईल. तसेच कचरा डेपोमध्ये फळझाडे, फुल झाडे लावण्यात येणार आहेत.

विद्यादेवी पोळ – मुख्याधिकारी वाई नगरपालिका

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.