सातारा – पालिकेच्या सभागृहात आरोग्य विभागाचे निरीक्षक राजेंद्र कायगुडे यांनी 2020 च्या स्वच्छ सर्व्हेक्षणाच्या पुस्तिका नगरसेवकांना वाटल्या खऱ्या परंतु, शहरातील प्रत्येक वॉर्डातून गोळा करण्यात येणारा कचरा हा घंटागाड्यांतून ओला आणि सुका असा वेगवेगळा करुन सोनगाव कचरा डेपोत टाकला जात नाही. नागरिक घंटागाडीत एकत्रितपणे कचरा टाकतात. एवढेच काय ट्रक्टर ओतपोत भरुन कचरा वाहून नेतात. शहरात ठिकठिकाणी बायोवेस्टही आढळून येवू लागले आहे. त्यामुळे 2020 च्या स्वच्छ सर्व्हेक्षणात तरी सातारा पालिकेचा वरचा नंबर येणार काय? असा सवाल उपस्थित होवू लागला आहे.
सातारा शहर हे सुंदर ठेवण्यासाठी पालिकेच्यावतीने कचरा गाडया प्रत्येक वॉर्डात सुरु केल्या. शहर कचरा कुंडीमुक्त करण्यासाठी कुंड्या बंद केल्या खऱ्या पण त्याच ठिकाणी कचरा पडायचा काही अंशी थांबला गेला. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा करुन ओल्या कचऱ्यापासून खत तयार केले जाते. मात्र, सातारा शहरात असलेल्या घंटागाड्यांची अवस्था पाहिली तर ओला आणि सुका कचराच वेगवेगळा केला जात नाही.