बर्लिन – करोनाच्या प्रतिबंधासाठी लस विकसित करणाऱ्या बायोएनटेक आणि फायझर कंपन्यांच्या लसीविषयीच्या डेटाचे हॅकिंग झाले असल्याचा दावा या कंपन्यांनी केला आहे. “युरोपियन मेडिसीन एजन्सी’च्या सर्व्हरवर झालेल्या सायबर हल्ल्यामध्ये हा डेटा बेकायदेशीरपणे मिळवला गेला असल्याचा दावा या कंपन्यांनी केला आहे.
ऍम्स्टरडॅम इथे असलेल्या “युरोपियन मेडिसीन एजन्सी’च्या कार्यालयातून युरोपिय संघाचे सदस्य असलेल्या 27 देशांसाठी करोना विरोधी लसीच्या मागण्या नोंदवल्या जातात. या लसीचा डाटा मिळवण्यासाठी सायबर हल्ला केला जाऊ शकतो, अशी शक्यता युरोपिय संघाने बुधवारीच व्यक्त केली होती.
या सायबर हल्ल्याबाबतचा तपास प्रगतीपथावर असल्यामुळे “युरोपिय मेडिसीन एजन्सी’ने या संदर्भात विशेष तपशील उपलब्ध करून दिलेला नाही. मात्र बायोएनटेक-फायझर कंपन्यांनी त्याबाबत स्वतंत्रपणे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. लसीच्या चाचणीच्या उमेदवारांबाबतचे अहवाल “ईएमए’च्या सर्व्हरवर जतन केलेले होते. ते बेकायदेशीरपणे मिळवले गेले आहेत, असे या निवेदनामध्ये म्हटले गेले आहे.
उमेदवारांना या डेटाची कल्पना नसल्यामुळे फायझर किंवा बायोएनटेकची कोणतीही यंत्रणा भेदली गेलेली नाही. सध्या तरी “ईएमए’कडून या सायबर हल्ल्याचा तपास केला जातो आहे. त्यानंतर युरोपिय संघाच्या कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे कंपन्यांनी म्हटले आहे.
फायझर-बायोएनटेकच्या लसीला ब्रिटन आणि कॅनडामध्ये गेल्याच आठवड्यात आपत्कालिन मंजूरी मिळाली आहे.
अमेरिकेत या लसीला मंजूरी मिळण्याबाबत विचार सुरू आहे. करोना लसीचा डाटा मिळवण्याचा यापूर्वीही प्रयत्न झाला होता. गेल्या महिन्यात आघाडीच्या औषध कंपन्या आणि संशोधकांचा डाटा मिळवण्याचा प्रयत्न रशिया आणि उत्तर कोरियाच्या हॅकरनी केला होता, असे मायक्रोसॉफ्टनेही म्हटले आहे.
कॅनडा, फ्रान्स, भारत, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेतील कोविड-19 च्या लसी आणि उपचारांशी संबंधित केंद्रांना लक्ष्य केले गेले असल्याचे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे.