इथेनॉलचा प्रयोग यशस्वी : क्रुडची बचत होण्यास मदत
पुणे – क्रुडची आयात कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून विविध शहरात मोठ्या हॉटेलात वापरलेल्या खाद्य तेलापासून बायोडिझेल तयार करण्याच्या शक्यतेवर विचार केला जात आहे.
सुरुवातीला सरकारी तेल वितरण कंपन्या हे बायोडिझेल 51 रुपये प्रति लिटर दराने खरेदी करतील. त्यानंतर पुढच्या वर्षी या बायोडिझेलला 52 रुपये 70 पैसे भाव देण्यात येईल. त्यात तिसऱ्या वर्षी वाढ करून हा भाव 54 रुपये 50 पैसे करण्यात येणार आहे. हॉटेल आणि मोठ्या समारंभावेळी मोठ्या प्रमाणात खाद्य पदार्थ तयार केले जातात. या ठिकाणी उरलेले खाद्य तेल टाकून देण्यात येते.
निविदा जारी करून सरकारी तेल कंपन्यांना स्थानिक पातळीवरील उत्पादकाकडून खाद्यतेलाचे बायोडिझेलमध्ये रुपांतरण करून घेतील. वापरलेले खाद्यतेल या कामासाठी वापरले जावे याकरिता एक मोबाइल ऍप तयार करण्यात आले आहे. याची माहिती हॉटेल आणि मोठे कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना दिली जाईल.
सध्या भारतात प्रत्येक महिन्याला 850 कोटी लिटर डिझेल वापरले जाते. यात 5 टक्के बायोडिझेल टाकण्याचा सरकारचा विचार आहे. तसे केल्याने मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकेल.
…तर रोजगार निर्मिती होऊ शकणार
भारतात स्वयंपाकासाठी 2700 कोटी लिटर खाद्य तेल वापरले जाते. त्यातील 140 कोटी लिटर वाया जाते. त्यातून 110 कोटी लिटर बायोडिझेल प्रत्येक वर्षाला तयार केले जाऊ शकते. त्यामुळे केवळ बचत होणार नाही तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकेल. सध्या उसाच्या मळीपासून इथेनॉल तयार केले जाते. शेतात मिळणाऱ्या इतर कचऱ्यापासूनही इथेनॉल तयार करण्यावर गंभीरपणे विचार चालू आहे. 5 वर्षांपूर्वी पेट्रोलमध्ये दीड टक्के इथेनॉल मिसळले जात होते. आता ते प्रमाण 7 ते 8 टक्क्यांवर आले आहे. लवकरच हे प्रमाण 20 टक्क्यांपर्यंत वाढेल.