खेळाडूंसाठी बायोबबल तयार – राजीव शुक्‍ला

नवी दिल्ली – भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या आयपीएलचा चौदावा हंगाम सुरू होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र, संपूर्ण देशात पुन्हा करोना संकटाने डोकेवर काढले आहे. यामुळे यावर्षी आयपीएलची स्पर्धा कशी खेळवली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याचपार्श्‍वभूमीवर बीसीसीआयने महत्वाचा निर्णय घेतला आहे.

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्‍ला म्हणाले, करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे बीसीसीआयकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. आयपीएलच्या स्पर्धा खेळवण्यासाठी 6 ठिकाण निश्‍चित करण्यात आली आहेत. महत्वाचे म्हणजे, ही स्पर्धा प्रेक्षकांविना खेळवली जाणार आहे. तसेच खेळाडूंसाठी बायो-बबल तयार करण्यात आले आहेत. याशिवाय, प्रत्येक संघाच्या खेळाडूंमध्ये वाढ करण्यात आली आहे, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.

करोना संकटामुळे 2020ची आयपीएल स्पर्धा भारताबाहेर संयुक्त अरब आमिराती येथे खेळवण्यात आली होती. आता सलग दुसऱ्या वर्षी आयपीएलवर करोनाचे संकट घोंगावत आहे. नुकतीच दिल्ली कॅपिटल्सच्या संघातील दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर बीसीसीआयकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

दरम्यान, आयपीएल स्पर्धा 9 एप्रिलपासून सुरू होत आहे. मुंबईत ज्या संघांचे सामने आहेत ते संघ शहरात दाखल झाले आहेत. नियमानुसार संबंधित संघांचे सर्व सदस्य बायो बबलमध्ये आहेत. तसेच करोना झालेले दोन क्रिकेटपटू आणि वानखेडेचे कर्मचारी यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. डॉक्‍टरांच्या देखरेखीत उपचार सुरू आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.