शहरातील बांधकाम साईटवर “सीसीटीव्ही’ बंधनकारक करा

महापौर राहुल जाधव यांच्या आयुक्‍त हर्डिकर यांना सूचना
कायदा सुव्यवस्थेबाबत नगरसेवकांची सभेत नाराजी

पिंपरी  – पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या सर्वच्या सर्व बांधकाम साईटवरील मजुरांची आणि त्यांच्या मुलांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. बांधकाम साईटवर होणाऱ्या दुर्घटना अत्यंत दुर्देवी असून, या घटना भविष्यात रोखण्यासाठी तसेच त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी शहरातील सर्व बांधकाम साईटवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक करावे, असे आदेश आज (गुरुवारी) महापौर राहूल जाधव
यांनी दिले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. आज झालेल्या सभेत गत आठवड्यात शहरात झालेले चार खून व अडीच वर्षांच्या चिमुरडीवर झालेला अत्याचार व त्यानंतर तिचा खून करण्यात आल्याचे पडसाद उमटले. सुरुवातीला निधन झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करून सभेच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली. सर्वांनीच शहरातील बिघडत्या कायदा सुव्यवस्थेबाबत जोरदार आवाज उठविला.

शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे म्हणाले, शहरात आठवडाभरात चार खुनाचे प्रकार घडले आहेत. याशिवाय अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार ही बाब अत्यंत दुर्देवी आहे. शहरातील बिघडत चालेलली परिस्थिती गांभिर्याने पाहणे गरजेचे आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आळा बसविण्यासाठी पोलिसांशी समन्वय साधला पाहिजे. महिला नगरसेवकांच्या माध्यमातून सभागृहाच्या भावना पोलीस आयुक्तांपर्यंत पोहाचवाव्यात. मंगला कदम म्हणाल्या, शहरातील बलात्काराच्या घटनेत वाढ झाली आहे. छेडछाडीच्या घटनाही वाढल्या असून, महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.

अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार ही बाब दुर्देवी आहे. या नराधमावर कारवाई झालीच पाहिजे. सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, स्मार्ट सिटी म्हणून आपण विकसित होत असताना शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. चिमुरडीवरील अत्याचार ही घटना दुर्देवी आहे. समाजातील अशी विकृती संपविण्याची गरज आहे. शहरात ज्या-ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात यावेत. सदस्यांच्या तीव्र भावना ऐकून घेतल्यानंतर राहुल जाधव यांनी वरील आदेश दिले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.