भामा-आसखेड प्रकल्प : ऑक्‍टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण करा

पुणे – भामा-आसखेड धरणाच्या जॅकवेलचे काम ऑक्‍टोबर अखेर पूर्ण करून तो कार्यान्वित करण्याचे आदेश महापालिका आयुक्‍त सौरभ राव यांनी दिले आहेत. त्यांनी सोमवारी प्रकल्पाची पाहणी केली. अतिरिक्‍त आयुक्‍त डॉ. विपीन शर्मा, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, प्रवीण गेडाम, मनीषा शेकटकर यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सुमारे सहा वर्षांपासून सुरू असलेल्या या योजनेचे काम शेवटच्या टप्प्यात असून राज्य राखीव पोलिसांच्या बंदोबस्तात हे काम सुरू आहे. उर्वरित कामात प्रामुख्याने जॅकवेल तसेच 1 किलोमीटरच्या मुख्य जलवाहिनीसह 7 किलोमीटरच्या उच्च दाबाच्या भूमिगत विद्युत वाहिनीचे काम शिल्लक आहे. आयुक्‍तांनी या तीनही कामांची पाहणी केली. त्यात प्रामुख्याने सप्टेंबर अखेरपर्यंत जॅकवेलचे काम पूर्ण करून पुढील महिन्याभरात तो कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच, सप्टेंबर अखेरपर्यंतच विद्युत वाहिनीचे कामही पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. तर उर्वरीत 1 किलोमीटरच्या जलवाहिनीसाठी ठेकेदारास 31 ऑक्‍टोबरपर्यंत मुदत देण्यात आली असून त्यासाठी आवश्‍यक पोलीस बंदोबस्त तातडीने उपलब्ध करून देण्यात येईल, अशा सूचनाही देण्यात आल्या. याशिवाय, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतही मोठ्या प्रमाणात काम शिल्लक असून त्यासाठी दोन्ही महापालिकांची संयुक्‍त बैठक घेऊन तातडीने ही कामे मार्गी लावण्याच्या सूचनाही आयुक्‍तांनी यावेळी केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.