नवी दिल्ली – भारताची एकेरीतील आघाडीची खेळाडू अंकिता रैना आणि अनुभवी सानिया मिर्झा यांचा भारतीय टेनिस संघात समावेश करण्यात आला असून, पुढील महिन्यात होणाऱ्या बिली जीन किंग करंडक स्पर्धेच्या जागतिक फेरीत त्यांच्यावरच भारताची मदार असेल. भारताची गाठ लॅटवियाशी होणार असून,या स्पर्धेसाठी आज भारताचा पाच सदस्यीय संघ जाहिर करण्यात आला.
अंकिता आणि सानियाखेरीज करमन कौर ठंडी, झील देसाई आणि ऋतुजा भोसले यांचा संघात समावेश आहे. भारतीय टेनिस संघटनेच्या निवड समितीने आभासी पद्धतीने बैठक घेऊन हा संघ निवडला. गेल्या वर्षी भारतीय संघात असलेली रिया भाटिया या वेळी राखीव खेळाडूंत आहे. संघाचे कर्णधार म्हणून विशाल उप्पल यांची निवड करण्यात आली आहे.
डेव्हिस करडंक स्पर्धेत एकेरीच्या लढती झाल्यावर परतीच्या लढतीपूर्वी मध्ये दुहेरीची लढत खेळविली जाते. मात्र, या स्पर्धेत दुहेरीची लढत शेवटी खेळविली जाते. त्यामुळे लढत अखेरच्या फेरीपर्यंत गेली, तरच सानियाच्या अनुभवाचा फायदा संघाला मिळेल. त्यामुळे एकेरीतील अंकिता आणि झील या दोन भारताच्या प्रमुख खेळाडू असतील.
रियाचे मानांकन 359 असाना तिच्यापेक्षा खूपच मागे असलेल्या झील देसाईच्या (614) निवडीवरून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. भारतात अंकितानंतर रिया दुसऱ्या क्रमांकावर असली, तरी सध्या झील तिच्यापेक्षा चांगल्या फॉर्ममध्ये आहे.
इंदौरला रंगणार सामने
लॅटवियाविरुद्धची दोन दिवसीय ही लढत 16 एप्रिल रोजी इंदौर येथे हार्डकोर्टवर खेळविण्यात येणार आहे. भारतीय संघ गेल्यावर्षी दुबई येथे झालेल्या आशिया-ओशियाना गट 1 च्या लढतीत दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. त्यामुळे भारतीय संघ जागितक गटासाठी पात्र ठरला. त्याचवेळी लॅटविया त्यांच्या गटात अमेरिकेविरुद्ध उपविजेता ठरला होता. अर्थात, भारताला ही लढत सोपी नाही. माजी फ्रेंच ओपन विजेती जेलेना ओस्टापेन्को, 2018 ची अमेरिकन स्पर्धेत उपांत्य फेरी गाठलेली ऍनास्तासिया सेवात्सोवा यांच्या समावेशाने लॅटवियाची ताकद वाढली आहे.