कलंदर: कोटीच्या कोटी उत्पन्न

उत्तम पिंगळे

रविवारी सकाळीच प्राध्यापकांना देवीच्या देवळात भेटलो. अष्टमीला ते सकाळीच देवळात येतात. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी म्हणालो, ज्यांनी ज्यांनी निवडणूक फॉर्म भरले आहेत त्या बहुतेकांकडे कोट्यवधींची मालमत्ता आहे. म्हणजे सामान्य माणसाच्या हातात निवडणूक लढवणे आता राहिलेले नाही. तसेच या साऱ्या कोट्यधीशांची चौकशी व्हायला नको का? यावर प्राध्यापक हसू लागले. मी त्यांना म्हणालो की, तुम्ही हे हसण्यावारी नेताय? त्यावर ते म्हणाले की, मी काय म्हणतो ते जरा ऐका…

तुमचा महत्त्वाचा मुद्दा आहे की या साऱ्यांचे कोट्यवधींचे उत्पन्न आले कुठून वगैरे? (मी मान डोलावली) पहिला मुद्दा असा आहे की, हे जाहीर उत्पन्न आहे. म्हणजे उद्या यात काही चौकशी झालीच तर त्या साऱ्यांचा पुरावा या लोकांपाशी आहे, हे उत्पन्न कुठून आले वगैरे. आता यात काही अघोषित उत्पन्नही असू शकते जे सरकारला समजले नाही. उद्या ते निदर्शनास आल्यास त्याच्यावर कारवाई होऊ शकते. आता यात दोन मुद्दे आहेत की हे उत्पन्न आले कुठून? पहिला मुद्दा म्हणजे कित्येकांनी आपले व्यवसाय दाखवले आहेत तर कित्येकांनी आपण शेतकरी म्हणून दाखवले आहे. व्यवसायामध्ये अशा कित्येक गोष्टी असतात की ज्या आपण करमुक्‍तही दाखवू शकतो.

कित्येक असे समाज आहेत जे पूर्ण व्यवसायात असतात. पुढे यांची मुले सीए वा वकील होऊन त्या व्यवसायात मदत करतात. आता मला एका गटाला किंवा व्यवसायाला पूर्णपणे टार्गेट करावयाचे नाही. पण कित्येकदा आपण पाहतो की वकील जो कायद्याच्या बाजूने लढणार तोच किती तरी वेळेला कायद्यातल्या पळवाटा काढून देण्याचे काम करत असतो. किती सीएंच्या बाबतीतही तेच घडत असते. येणारा पैसा तो कोणत्या मार्गाने दाखवायचा किंवा व्यवसाय असेल तर त्यात किती कोठे खर्च दाखवायचा की जेणेकरून कमीत कमी कर भरावा लागेल.म्हणजेच करप्रणालीमधील ज्या पळवाटा आहेत किंवा जेथे कायद्याचा अर्थ जरा धूसरच असतो म्हणजे काही गोष्टींचा अर्थ आपण लावू असा होतो मग यातूनच पळवाट काढली जाते. कित्येक जुने व्यापारी हे नक्‍की काय व्यवसाय करतात ते त्यांचे त्यांनाच समजते. पण नवीन पदवीधर किंवा एमबीए धारकांना ते सल्ला देत असतात की, तुम्ही नोकरी करा.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतीतून होणारा फायदा. जर नोकरदार दहा लाख उत्पन्नावर तीस टक्‍के कर भरत असतो, तर एखाद्या शेतकऱ्याचा निव्वळ नफा जर दहा लाखांवर असेल तर दहा टक्‍के कर भरण्यास काय हरकत आहे? मुख्य मेख तर येथेच आहे. ज्याला मार्जिनल फार्मर किंवा सीमांत शेतकरी म्हणतात तो कमी जमीन असल्याने पारंपरिक शेती करतो. त्याचा खर्च खूप असतो व अगदी शेवटी कर्जबाजारी होऊन आत्महत्येपर्यंत पोहोचतो. पण जे सधन शेतकरी असतात ते आधुनिकीकरण करून भरपूर उत्पन्न मिळवू शकतात व फायदाही.आता येथे ज्यांची जास्त जमीन आहे ते जास्त उत्पन्न दाखवून ते पूर्ण करमुक्‍त म्हणून दाखवले जाते.

शेतकऱ्यांचे नाव पुढे करून शेतकी उत्पन्न करमुक्‍त दाखले जात आहे. म्हणूनच नेत्यांना उगाच शेतकऱ्यांचा कळवळा असतो? तो शेतकऱ्यांसाठी नसून स्वत:चे उत्पन्न कसे करमुक्‍त राहील यासाठी असतो. त्यामुळे एकीकडे शेती व्यवसायाला व्यवसाय स्वरूप देत असताना त्यावर होणाऱ्या निव्वळ नफ्यावर कुठे तरी कर सुरू करायलाच हवा. पण कायदा करणारे तेच मग मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?
उत्पन्न माझे कोटींच्या कोटी…
“शेती उत्पन्न’ बा तू घाल पोटी…

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here