वॉशिंग्टन – जगभरातील शेकडो ताकदवान राजकारणी नेते, अब्जाधीश उद्योजक, सेलिब्रिटी, धार्मिक नेते आणि अगदी ड्रग्जचे तस्कर आपली अघोषित संपत्ती विदेशात सुरक्षित ठेवत असतात. विदेशातील मालमत्तांमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केलेली असते.
गेल्या पाव शतकापासून ही अघोषित मालमत्ता विदेशात दडवून ठेवली जात आहे. अशी माहिती शोध पत्रकारिता करणाऱ्या आंतरराष्ट्रीय पत्रकारांच्या संघटनेने शोधून काढली आहे. जगभरातील 14 मोठ्या कंपन्यांच्या 1 कोटी 20 लाख फायलींच्या माध्यमातून ही माहिती उघड करण्यात आली आहे.
या उच्चभ्रू व्यक्तींमध्ये जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय, ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर, चेक प्रजास्ताकचे पंतप्रधान अँद्रेज बाबिस केनियाचे अध्यक्ष उहूरू केन्याता, इक्वाडोरचे अध्यक्ष गुलेर्नो लासो यांच्यासह पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्या निकटवर्तीयांचाही समावेश आहे.
याशिवाय तुर्कीतील प्रख्यात बांधकाम उद्योजक इम्रान इलिकॅक आणि रेनॉल्डस ऍन्ड रेनॉल्डस या सॉफ्टवेअर कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रॉबर्ट टी ब्रॉकमन यांचाही समावेश आहे. करचुकवेगिरी करण्यासाठी आणि अन्य कारणांसाठी या मालमत्ता दडवण्यात आल्याचे उघड करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये म्हटले आहे.
ज्या ठिकाणी ही प्रचंड माया दडवली आहे ती ठिकाणे म्हणजे ब्रिटीश व्हर्जिन आयलंड, सेशेल्स, हॉंगकॉंग आणि बेलिझ ही आहेत. याशिवाय काही खाती ही अमेरिकेतील काही ट्रस्टमध्येही विभागली गेली आहेत. त्यात साऊथ डकोटामध्ये 81 आणि फ्लोरिडामध्ये 37 अशाप्रकारची खाती आहेत.
ज्या व्यक्तींची नावे या प्रकरणात उघड झाली आहेत, त्यातील जॉर्डनच्या राजांनी 1995 पासून 2017 दरम्यान किमान तीन डझन बनावट कंपन्या सुरू केल्या आहेत. त्यांनी अमेरिका आणि ब्रिटनमध्ये 106 दशलक्ष डॉरची 14 घरे विकत घेतली आहेत. पॅंडोरा पेपर्स प्रकरणी जॉर्डनच्या राजघराण्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकलेली नाही. राजे अब्दुल्ला यांच्या सावत्र भावाने लिकडेच राजघराण्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र हे आपल्या बदनामीचे कारस्थान असल्याचे राजांनी म्हटले होते.
ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी 2017 मध्ये 8.8 दशलक्ष डॉर किंमतीची व्हिक्टोरियन इमारत विकत घेतली. याच इमारतीत आता ब्लेअर यांची पत्नी चेरी ब्लेअर यांच्या कायदाविषयक कंपनीचे कार्यालय आहे. या दाम्पत्याने बहारीनचे उद्योग आणि पर्यटन मंत्री झ्यायेद बिन रशिद अल झयानी यांची कंपनी विकत घेतली. त्यातून ब्लेअर दाम्पत्याला 4 लाख डॉलरचा मालमत्ता कर वाचवता आला.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे स्वतःचे नाव या प्रकरणात नाही. मात्र त्यांच्या निकटवर्तींपैकी अर्थ मंत्री शौकत फयाझ अहमद तारीन यांनी ट्रस्टच्या माध्यमातून लक्षावधी डॉलरची संपत्ती दडवून ठेवल्याचा आरोप आहे.
याशिवाय इतर अनेक देशांच्या प्रमुखांची नावेही या प्रकरणात आहेत. या पैशांचा किती उपयोग प्रत्यक्ष निवडणूकीसाठी केला गेला हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही.
3 फेराबाईट इतका प्रचंड डाटा
2016 मध्ये याच पत्रकारांच्या गटाद्वारे “पनामा पेपर्स’नावाने असेच एक मोठे प्रकरण उघड करण्यात आले होते. त्याच प्रकरणाचा पाठपुरावा म्हणजे “पॅंडोरा पेपर्स’ आहे, असे सांगितले जात आहे. मात्र या प्रकरणाची व्याप्ती “पनामा’पेक्षा खूप व्यापक आहे. पनामा पेपर्सचा डाटा 2.6 टेराबाईट इतका होता. तर पॅंडोरा पेपर्सच्या फायलींच्या डाटाची व्याप्ती 3 फेराबाईट इतकी प्रचंड आहे. त्यामध्ये स्मार्टफोनमध्ये साठवलेले 7 लाख 50 हजार फोटो आहेत. हे स्मार्टफोन जगभरातील 38 वेगवेगळ्या कार्यकक्षांमध्ये 14 वेगवेगळ्या कंपन्यांची सेवा पुरवणारे आहेत. या नोंदीं 1970 पासूनच्या आहेत. बहुतेक नोंदी 1996 ते 2020 दरम्यानच्या आहेत.
600 पत्रकारांचा सहभाग
“इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इंटरनॅशनल इन्व्स्टिगेटिव्ह जर्नालिस्ट’ या पत्रकारांच्या संघटनेने शोधून काढलेली ही माहिती रविवारी प्रसिद्ध करण्यात आली. या प्रचंड मोठ्या शोधकार्यामध्ये 117 देशांमधील 150 प्रसिद्धी माध्यम समुहांमधील तब्बल 600 पत्रकार सहभागी झाले होते. या शोध मोहिमेला “पॅंडोरा पेपर्स’ असे नाव देण्यात आले आहे. उच्चभ्रू आणि भ्रष्ट व्यक्तींच्या विदेशीातील अब्जावधी डॉलरच्या मालमत्तेवर यातून प्रकाश टाकण्यात आला आहे.