वॉशिंग्टन – करोनाच्या साथीचा मुकाबला करण्यासाठी भारतात जगभरातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम सुरू होत असल्याच्या पार्श्वभुमीवर जगभरातील नेत्यांनी भारतातील वैज्ञानिक संशोधन क्षेत्राचे आणि निर्णायक कृतीचे कौतुक केले आहे.
देशातील “ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने रविवरी ऑक्सफोर्ड विद्यापिठाच्या “कोविशिल्ड’ आणि भारत बायोटेकने विकसित केलेल्या स्वदेशी बनावटीच्या “कोवॅक्सिन’ या दोन लसींच्या मर्यादित आणि आपत्कालिन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे देशातील व्यापक लसीकरण मोहिमेला सुरुवात होऊ शकणार आहे.
भारतीय नेतृत्व वैज्ञानिक नाविन्य आणि औषध उत्पादन क्षमतेच्या आधारे कोविड-19 संपवण्यासाठी प्रभावी पावले उचलत असल्याचे बघून खूप आनंद वाटतो आहे, असे बिल ऍन्ड मेलिंडा गेट्स फौंडेशनचे सहप्रमुख बिल गेट्स यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांनी हे ट्विट करताना पंतप्रधान कार्यालयाला टॅग केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेड्रोस ऍधानोम घेब्रेयसस यांनीही भारताला शुभेच्छा देताना कोविड-19 संपवण्यासाठी निर्णायक कृती यापुढेही करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. दोन लसींना परवानगी मिळाल्याने देशात जगभरातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम सुरू होणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते.
या लसी स्वदेशात विकसित केलेल्या असल्याने देशाला त्याबद्दल अभिमान आहे, असेही पंतप्रधान म्हणाले होते. कोविड -19 साथीविरोधातील लढाईत सर्व मानवतेला मदत करण्यासाठी लसीचा उपयोग केला जाईल, असे आश्वासन मोदी यांनी जागतिक समुदायाला दिले आहे.