दोन दशकाहून अधिक काळ संसार केल्यानंतर बिल गेट्स आणि मेलिंडा होणार विभक्त

न्यूयॉर्क : मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक असणाऱ्या बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी लग्नानंतर २७ वर्षांनी विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्या या निर्णयाने संपूर्ण जगात एक प्रकारे खळबळ उडाली आहे. दरम्यान, या दोघांनीही एक संयुक्त पत्रक जारी करत यापुढे आम्ही दोघे यापुढे एकत्र राहू शकत नाही, असे स्पष्ट केले आहे.

बिल गेट्स आणि मेलिंडा यांचे लग्न १९९४ साली झाले होते. बिल गेट्स हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे. बिल यांनी सोशल मीडियावर ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली आहे. यामध्ये त्यांनी, “बऱ्याच चर्चेनंतर आणि आपल्या नात्यावर बरंच काम केल्यानंतर आता आम्ही लग्नबंधनातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. मागील २७ वर्षांमध्ये आम्ही आमच्या तीन मुलांना एकत्र वाढवले. आम्ही एक फाऊण्डेशन तयार केले जे जगभरातील लोकांना आरोग्य सुविधा आणि चांगले राहणीमान देण्यासाठी प्रयत्न करत आहे,” असे म्हटले. बिल आणि मेलिंडा यांची पहिली भेट १९८७ साली झाली होती. त्यावेळी मेलिंडा यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये प्रोडक्ट मॅनेजर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. सन १९९४ मध्ये या दोघांनी हवाई बेटांवरील लानी बेटावर लग्न केले होते.

बिल आणि मेलिंडा यांनी सिएटलमधील किंग काऊण्टी सुपिरियर कोर्टात दाखल केलेल्या संयुक्त याचिकेमध्ये. “आम्ही कारण सांगू शकत नाही मात्र हे लग्न मोडावं लागत आहे,” असे म्हटले आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार ‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन’ने हे दोघे घटस्फोट घेणार असले तरी फाउंडेशनमधील आपली जबाबदारी आणि पद कायम ठेवणार आहेत. फाउंडेशनमध्ये ६५ वर्षीय बिल हे अध्यक्ष आहेत. घटस्फोटानंतरही बिल आणि मेलिंडा एकत्र काम करतील. मेलिंडा सध्या फाउंडेशनच्या उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहे,

या दोघांनाही कोर्टात केलेल्या अर्जामध्ये आमची तिन्ही मुलं सज्ञान आहेत असे म्हटले आहे. या दोघांच्या सर्वात धाटक्या मुलाने नुकताच १८ व्या वर्षांत पदार्पण केले आहे. दोघांनाही या अर्जामध्ये संपत्तीचे वाटप कसे होणार याबद्दल एकमत झाल्याचे म्हटले आहे. मात्र संपत्तीच्या वाटपासंदर्भातील सविस्तर तपशील त्यांनी दिलेला नाही.

२००० साली सुरु करण्यात आलेले ‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन’ हे जगभरामध्ये आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वात मोठ्या खासगी संस्थांपैकी एक आहे. २०१९ साली या संस्थेनचे मूल्य ४३.३ बिलियन डॉलर इतकं होतं, असं संस्थेच्या वेबसाईटवरील डेटावरुन स्पष्ट होतं आहे. बिल यांचे वडील बिल गेट्स सीनियर यांचा मागच्या वर्षीच मृत्यू झाला. ते ९४ वर्षांचे होते. गेट्स कुटुंबाने दिलेल्या पत्रकानुसार मागील बऱ्याच काळापासून बिल गेट्स सीनियर हे अल्जाइमरच्या आजाराशी झुंज देत होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.