इस्लामाबाद : शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या आगामी इस्लामाबाद दौऱ्यादरम्यान भारतासोबत द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करण्यास पाकिस्तानने सोमवारी नकार दिला. इस्लामाबाद येथे होणाऱ्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी जयशंकर भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार असल्याचे भारताने शुक्रवारी जाहीर केले. आता पाकिस्ताननेही या दौऱ्यादरम्यान द्विपक्षीय चर्चेची शक्यता फेटाळली आहे.
पाकिस्तान इस्लामाबादमध्ये १५ ते १६ ऑक्टोबर दरम्यान शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या प्रमुख नेत्यांच्या २३ व्या परिषदेचे आयोजन करणार आहे. मात्र यावेळी भारताबरोबर द्विपक्षीय चर्चा होणार नाही, असे परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी सांगितले. जयशंकर यांनी अलिकडेच याच मुद्यावरून दिलेल्या स्पष्टिकरणामध्ये पाकिस्तान दौऱ्यादरम्यान द्विपक्षीय चर्चेची शक्यता नाकारली होती.
आपण केवळ शांघाय सहकार्य संघटनेचे सदस्य म्हणून या दौऱ्याला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांचे हे वक्तव्य पुरेसे बोलके आहे, असे बलोच म्हणाल्या. पाकिस्तानला भेट देणाऱ्या शेवटच्या भारतीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज होत्या. डिसेंबर २०१५ मध्ये त्या अफगाणिस्तानवरील परिषदेत सहभागी होण्यासाठी इस्लामाबादला गेल्या होत्या.
पुलवामा दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी फेब्रुवारी २०१९ मध्ये भारताच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानातील बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी प्रशिक्षण शिबिरावर हल्ला केला होता. त्यानंतर ५ ऑगस्ट २०१९ रोजी भारताने जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेऊन राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध आणखी बिघडले.
पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी मे २०२३ मध्ये गोव्यात झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी भारतात आले होते. तब्बल १२ वर्षतंनंतर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची ही पहिलीच भारत भेट होती.