नवी दिल्ली – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स (Richard Marles) यांच्यामध्ये आज नवी दिल्ली येथे द्विपक्षीय बैठक झाली. उभय मंत्र्यांनी द्विपक्षीय संरक्षण संबंध अधिक दृढ करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. संयुक्त सराव, देवाणघेवाण आणि संस्थात्मक संवाद यांच्यासह दोन्ही देशांमधील लष्करांमधल्या सहकार्यामध्ये वाढ होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
दोन्ही देशांमध्ये माहितीची देवाणघेवाण आणि सागरी क्षेत्रामध्ये जागरूकता यासाठी सहकार्य आणखी वाढवण्याचे महत्त्व उभय मंत्र्यांनी अधोरेखित केले.दोन्ही देशांनी “हायड्रोग्राफी’ सहकार्य आणि एअर-टू-एअर रिफ्युलिंगसाठी आवश्यक त्या सहकार्याच्या अंमलबजावणीची व्यवस्था पूर्ण करण्यासाठी सुरू असलेली चर्चा आता पुढच्या टप्प्यात म्हणजेच प्रगतिपथावर आहे.
दोन्ही देशांच्या सैन्याने कृत्रिम बुद्धिमत्ता, पाणबुडीविरोधी आणि ड्रोनविरोधी युद्धपद्धती आणि सायबर क्षेत्र यांसारख्या विशिष्ट, आधुनिक प्रशिक्षण क्षेत्रात सहकार्य करण्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे,यावर राजनाथ सिंह यांनी भर दिला. संरक्षण उद्योग आणि संशोधन क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ केल्याने आधीच मजबूत असलेल्या संबंधांना चालना मिळेल, यावर दोन्ही मंत्र्यांनी सहमती दर्शवली.
पाण्याखाली वापरण्यासाठी तंत्रज्ञानामध्ये संयुक्त संशोधनासाठी सहकार्य करण्यावरही उभय मंत्र्यांनी चर्चा केली. तसेच संरक्षण स्टार्ट-अपमधील सहकार्यावर चर्चा केली.