नवी दिल्ली – बिहार विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने गुरूवारी उमेदवारांची दुसरी आणि अंतिम यादी जाहीर केली. त्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचे पुत्र लव आणि ज्येष्ठ नेते शरद यादव यांच्या कन्या सुभाषिनी यांना स्थान मिळाले आहे.
भाजपच्या माध्यमातून प्रदीर्घ काळ राजकारणात सक्रिय राहिलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी मागील वर्षी लोकसभा निवडणुकीआधी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. आता त्यांच्या मुलाला कॉंग्रेसने निवडणूक रिंगणात उतरवले आहे.
काही दिवसांपूर्वीच यादव यांच्या कन्या सुभाषिनी आणि लोक जनशक्ती पक्षाचे माजी खासदार काली पांडे यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनाही विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
राजदच्या नेतृत्वाखालील विरोधकांच्या महाआघाडीचा घटक म्हणून कॉंग्रेस पक्ष त्या निवडणुकीला सामोरा जात आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत. त्यातील 70 जागा कॉंग्रेस लढवत आहे.
बिहार निवडणुकीसाठी तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. ती प्रक्रिया 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबरला पार पडेल. त्यानंतर 10 नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल.