पाटणा – बिहारच्या जमुई जिल्ह्यातील खाणींमध्ये तब्बल 222 दशलक्ष टनाचा सोन्याचा साठा सापडण्याची शक्यता भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणातून समोर आली असून बिहार सरकारने या सोन्याच्या साठ्याच्या शोधासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले.
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार, जमुई जिल्ह्यात सुमारे 222.88 दशलक्ष टन सोन्याचा साठा आहे, ज्यामध्ये 37.6 टन खनिज समृद्ध धातूचा समावेश आहे.
राज्य खाण आणि भूविज्ञान विभाग जमुईमधील सोन्याच्या साठ्याच्या शोधासाठी जीएसआय आणि राष्ट्रीय खनिज विकास महामंडळासह अन्य एजन्सीशी सल्लामसलत करत आहे. जमुई जिल्ह्यातील करमाटिया, झाझा आणि सोनो सारख्या भागात सोने सापडण्याची शक्यता जीएसआयच्या सर्वेक्षणात आढळून आली आहे.
या साठ्याचा शोध घेण्यासाठी बिहार सरकारने संबंधीत संस्थांशी सामंजस्य करार करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात सध्या जे सोने उत्पादन होते त्यात बिहारचा वाटा सर्वाधिक आहे. केंद्रीय खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गेल्या वर्षी लोकसभेत माहिती दिली होती की, बिहारमध्ये 222.885 दशलक्ष टन सुवर्ण धातू आहे, जो देशातील एकूण सोन्याच्या साठ्यापैकी 44 टक्के आहे.