पाटणा : बिहारचे सिंघम अशी ओळख असलेले मराठमोळे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. शिवदीप लांडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे. शिवदीप लांडे यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. त्यांनी नेमका कोणत्या कारणामुळे राजीनामा दिला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
काय लिहिले पोस्टमध्ये?
शिवदीप लांडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर याची माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले कि प्रिय बिहार, गेली 18 वर्षे सरकारी पदाच्या माध्यमातून सेवा केल्यानंतर मी आता माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. माझ्या या सगळ्या कार्यकाळात मी बिहार राज्याला स्वत:पेक्षा आणि कुटुंबापेक्षा सर्वोच्च मानले आहे. माझ्या सेवेच्या काळात माझ्याकडून कोणतीची चुकभूल झाली असेल तर मी त्यासाठी क्षमस्व आहे. मी भारतीय पोलीस सेवेतून राजीनामा दिला आहे. मात्र, मी बिहारमध्येच राहणार आहे. यापुढेही बिहार हीच माझी कर्मभूमी असेल, असे शिवदीप लांडे म्हणाले आहेत.
कोण आहेत शिवदीप लांडे?
शिवदीप लांडे 2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. शिवदीप यांनी इलेक्ट्रीकल इंजिनिअरची पदवी शिक्षण घेतलं आहे. 29 ऑगस्ट 1976 रोजी बुलडाणा जिल्ह्यातील बडसिंगी इथं शिवदीप यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती अत्यंत बिकट. शिवदीप यांना एक मोठी बहिण आणि लहान भाऊ आहे. शिवदीप यांचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं. त्यानंतर त्यांनी सरकारी कोट्यातून अमरावती विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. यानंतर शिवदीप यांनी नोकरीनिमित्त थेट मुंबई गाठली. मुंबईत त्यांनी अनेक कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम केलं. मात्र समाजाप्रती काही करण्याची तळमळ त्यांना शांत बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी यूपीएससीची तयारी केली. यूपीएससीमध्ये पास झालेल्या शिवदीप लांडे यांना कलेक्टर बनण्याची इच्छा होती. पण रँक न मिळल्याने त्यांना आयपीएस स्वीकारावं लागलं.
मुंबईमध्ये देखील होते कार्यरत
शिवदीप लांडे हे मध्यतरी मुंबईत महाराष्ट्र पोलिस सेवेतही कार्यरत होते. लांडे हे शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत. त्यांनी मुंबईत अमली पदार्थ विरोधी पथकात कार्यरत असतानाही प्रभावी कामगिरी करत ड्रग्ज तस्करांचे कंबरडे मोडले होते. तर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त असताना अनेक महत्वाचे गुन्हे उघडकीस आणले होते.