‘त्या’ करुणामय दृष्यावरून बिहार हायकोर्टाकडून राज्य सरकारची झाडाझडती

पाटणा: अहमदाबादवरून बिहारच्या मुजफ्फरपूर रेल्वेस्थानकावर आलेली एक महिला तेथेच मरण पावली. रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म वर मृतावस्थेत पडलेल्या आपल्या आईला जागे करण्याचा प्रयत्न तिच्या लहानग्या बाळाने चालवल्याची करुणामय व्हिडीओ चित्रफीत सोशल मीडीयावर व काही वाहिन्यांवर दाखवली गेली होती. त्या घटनेवरून देशभर हळहळ व्यक्त केली जात असतानाच पाटणा उच्च न्यायालयानेही या प्रकरणावरून राज्य सरकारच्या वकिलांवर प्रश्‍नांची सरबत्ती करून त्यांची आज चांगलीच झाडाझडती घेतली. हा प्रकार अत्यंत धक्‍कादायक आहे, अशी टिप्पणी हायकोर्टाने केली.

या महिलेचे नाव अरबिना असे असून ती गुजरातमध्ये अहमदाबाद येथे मोलमजुरी करीत होती. तेथून ती श्रमिक ट्रेनने अहमदाबादला परतली होती. अत्यंत तळपत्या उन्हात ती अन्न आणि पाण्यावाचून तडफडून मेली अशी माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली आहे. पण राज्य सरकारच्या वकिलांनी कोर्टात सांगितले की, ही महिला तिच्या नातेवाईकांसह प्रवास करीत होती, ती मानसिकदृष्ट्या अस्थिर होती व तिचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे.

सरकारी वकिलांनी असे उत्तर दिल्यानंतर आम्हाला या प्रकरणावर गांभीर्याने लक्ष घालावे लागेल, असा इशारा कोर्टाने राज्य सरकारच्या वकिलाला दिला आणि त्यांनी या वकिलावर प्रश्‍नांची सरबत्ती केली. या मृत महिलेचे तुम्ही पोस्टमार्टेम केले का?, ही महिला खरेच उपासमारीने मेली याची तुम्ही नीट माहिती घेतली का?, यावर पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली?, सदर महिलेचे तिच्या धर्माप्रमाणे अंत्यसंस्कार केले का?, आणि सर्वात महत्त्वाचे आता तिच्या लहानग्या बाळाची नेमकी कोण काळजी घेत आहे? असे प्रश्‍न कोर्टाने त्यांना विचारले.

ही महिला तिची बहीण आणि मेहुण्याबरोबर येथे आली होती. तिचा नैसर्िर्गक मृत्यू झाल्याचे सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितले असले तरी त्याचा या नातेवाईकांनी इन्कार केला आहे. ही महिला वेडी किंवा मनोरुग्ण नव्हती, असे तिच्या नातेवाईकांनी सांगितले. या महिलेच्या मुलाला मृत महिलेच्या बहिणीकडे सुपुर्त करण्यात आले आहे, असेही सरकारी वकिलांनी नमूद केले. त्यानंतर या साऱ्या प्रकरणाची नीट माहिती घेऊन राज्याच्या मुख्य सचिवामार्फत प्रतिज्ञापत्राद्वारे ही माहिती सादर करा, असा आदेश पाटणा उच्च न्यायालयाने दिला आहे.

या प्रकरणाची सुनावणी कोर्टाने 3 जूनपर्यंत तहकूब केली आहे. याच रेल्वेस्थानकावर पाच वर्षाच्या मुलाचेही सोमवारी उपासमारीने निधन झाले. त्या मुलाला दूध किंवा अन्य मिळाले नाही त्यातून त्याचा मृत्यू झाल्याची बाबही निदर्शनाला आली आहे. अनेक श्रमिक स्पेशल ट्रेन रस्ता चुकत आहेत आणि त्यांना आपल्या नियोजित स्थानकांवर पोहोचण्यास 80 ते 90 तासांचा विलंब होत आहे. त्यामुळे प्रवाशांचे अन्नपाण्याअभावी अतोनात हाल होत असल्याच्या अनेक बातम्या प्रसारीत झाल्या असून यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागल्याच्याहीं बातम्या प्रसारीत झाल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.